शहरात घरफोडी, दुचाकी चोरी थांबेना, पोलिसांना चोरटे गवसेना

चोरट्यांमुळे वणीकर त्रस्त, कधी मिळणार चोरट्यांपासून सुटका?

विवेक तोटेवार, वणी: गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून वणी शहरात सुरु झालेले चोरीचे सत्र अद्यापही थांबले नाही. दरम्यान या काळात 5 ठाणेदार येऊन गेले. एका ठाणेदाराच्या बदलीचे कारण तर चोरट्याने पत्रकारावर हल्ला केल्याचे ठरले होते. शहरातील ठाणेदार बदलत आहेत. मात्र त्यातील एकाही ठाणेदारांना घरफोडी व दुचाकी चोरीवर अंकुश बसवता आला नाही. उलट चोरी व घरफोडीच्या घटनात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे वणीकर अद्यापही चोरट्यांच्या दहशतीतच जगत आहेत.

काही दिवसांआधीच पीआय अनिल बेहरानी यांनी वणी पोलीस स्टेशनचा ठाणेदार पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी पदभार घेताच सर्वप्रथम चोरट्यांनी त्यांना घरफोडीचा आहेर दिला. वणीतील नांदेपेरा रोडवरील एका घरून भरदिवसा पावने दोन लाखांची चोरी चोरट्यांनी केली. त्यानंतर कधी भरदिवसा तर कधी रात्री घरफोडी सुरू झाली. दुचाकी चोरी तर नित्याचीच बाब ठरली आहे. यात गोरगरीबांचे चांगलेच आर्थिक नुकसान होत आहे.

चोरटे अनेकदा सीसीटीव्हीत कैद
गेल्या दोन तीन वर्षात अनेकदा चोरटे सीसीटीव्हीत कैद झालेत. मात्र या सीसीटीव्हीत कैद झालेल्या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना काही यश आले नाही. अलिकडेच झालेल्या एका चोरीत देखील दोन चोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. 

चोरट्यांनी केली ठाणेदारांची बदली
दीड वर्षांपूर्वी वणीतील एका पत्रकाराच्या घरी चोरी करत चोरट्याने त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यात ते पत्रकार गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्याचे तीव्र पडसाद वणीत उमटले होते. शहरातील कायदा व सुव्यवस्था ठेवण्यात ठाणेदार अपयशी ठरले आहे, असा आरोप करत पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेत ठाणेदारांच्या बदलीची मागणी केली. अखेर या प्रकरणी दबाव वाढून तत्कालीन ठाणेदार राम महल्ले यांची बदली करण्यात आली होती.

ठाणेदारांसमोर चोरट्यांचे मुख्य आव्हान
चोरट्यांपासून त्रस्त झालेल्या वणीकरांना ठाणेदार अनिल बेहरानी यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आधी चोरी रात्री व्हायच्या मात्र आता चोरट्यांना दिवसाढवळ्या चोरी करायला देखील भीती नाही. ठाणेदार बेहरानी यांनी पदभार स्वीकारून अवघे काही दिवस झाले आहेत. मात्र जे आधीच्या ठाणेदारांना जमले नाही, ते नवीन ठाणेदार बेहरानी करून दाखवणार का? याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.