एकाच रात्री 2 घरफोडी, वणीतील साईलीला नगरीतील घटना

रक्षाबंधनला गेले गावी, चोरट्यांनी साफ केले घर

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील साईलीला नगरी, मुकुटबन रोड परिसरात दि. 10 ऑगस्ट 2025 रोजी चोरट्यांनी 2 घरी घरफोडी केली.  एका घरातून सुमारे  2 लाखांचा सोन्या चांदीचा मुद्देमाल तर दुस-या घरून 27 हजार रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. विशेष म्हणजे एका घरातील सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहे. घरी सीसीटीव्ही लावलेले कुचकामी ठरत आहे. सीसीटीव्ही घरी असतानाही चोरी होत असल्याने आता काय करावे, असा प्रश्न घरमालकांसमोर उभा राहिला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, राहुल तागडे हे जिल्हा परिषद शाळा, शिंदोला येथे शिक्षक आहेत. ते वणीतील मुकुटबन रोडवरील साईलीला नगर येथे कुटुंबासह राहतात. शनिवारी दि. 9 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंधन सणानिमित्त ते कुटुंबासह आकोला (ता. उमरेड, जि. नागपूर) येथे गेले होते. त्यांनी घराला कुलुप लावले होते. सकाळी त्यांना शेजा-यांचा कॉल आला. त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे ते तातडीने वणीसाठी निघाले. 

घरी परत आल्यानंतर घराच्या मुख्य दरवाज्याचा कोंडा तुटलेला आणि बेडरूममधील लोखंडी कपाट उघडे असल्याचे दिसले. कपाटातील 15 ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत ₹1,12,500/-) आणि 57 ग्रॅम चांदीचे दागिने (किंमत ₹71,250/-) चोरीस गेले. शेजारी राहणाऱ्या राजू श्रीराम राजुरकर यांच्या घरातून चोरट्यांनी नगदी 27 हजारांची रोख लंपास केल्याचे कळले. तसेच घराशेजारील एकाची युनिकॉर्न वाहनाची नंबर प्लेट चोरीस गेल्याचेही त्यांना कळले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

चोरटे सीसीटीव्हीत कैद
तागडे यांनी घरी सीसीटीव्ही बसवले आहेत. त्यामुळे चोरी झाल्याचे कळताच त्यांनी मोबाईलवर सीसीटीव्ही फुटेज चेक केले. फुटेजमध्ये रात्री पावने दोन वाजताच्या सुमारास एक अज्ञात चोरटा घरात शिरल्याचे दिसले. तर दुसरा चोरटा घराबाहेर उभा होता. एका चोरट्याने सीसीटीव्ही कॅमेराची दिशा बदलली. त्यामुळे चोरटे नेमके किती होते हे कळले नाही. मात्र किमान दोन किंवा त्यापेक्षा अधिक चोरटे असण्याची शक्यता आहे. घरी सीसीटीव्ही लावलेले असतानाही चोरी होत असल्याने आता काय करावे, असा प्रश्न घरमालकांसमोर उभा राहिला आहे.

या प्रकरणात तागडे यांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींविरोधात बीएनएसच्या कलम 331(4) व 305(a)  नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजवरून संशयितांचा शोध घेण्यात येत आहे.

Comments are closed.