सैदाबाद फाटा ते इजासन रस्त्यावरील झाडं झुडपं ठरतये धोकादायक

रस्ता मोकळा करण्याची मागणी, ग्रामस्थांचे जिल्हा परिषदला निवेदन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी तालुक्यातील सैंदाबाद फाटा ते इजासन गावापर्यंतच्या रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झाडे-झुडपांमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळलेल्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला निवेदन दिले. युवा सामाजिक कार्यकर्ते विजय बलकी यांच्या नेतृत्त्वात निवेदन देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे की, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाढलेली झुडपे आणि झाडांमुळे वाहनचालकांसह पायी चालणाऱ्यांना मोठी गैरसोय होत आहे. यामुळे दृश्यमानता कमी झाली असून, विशेषतः रात्रीच्या वेळी अपघातांचा धोका वाढला आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने या झुडपांची विल्हेवाट लावून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी करण्यात आली.

निवेदन देताना विजय बलकी यांच्यासह कुंभारखणी (इजासन) गट ग्रामपंचायत सदस्य संकेत मोहिते, पत्रकार योगेश तेजे, सुरेश खामनकर, दिवाकर काकडे आणि इजासन येथील ग्रामस्थ उपस्थित होते. या मागणीला गती मिळावी, यासाठी ग्रामस्थांनी पुढील पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.

Comments are closed.