भालर व मुकुटबन येथील शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, 700 रुग्णांची तपासणी

32 रुग्णांची होणार शस्त्रक्रिया, 5 डिसेंबरला गरुजूंना चष्मे वाटप, विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून भव्य नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन

वणी बहुगुणी डेस्क: समाजकारणी, राजकारणी आणि दातृत्त्वाचे धनी असलेल्या विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून व मार्गदर्शनात भालर आणि मुकुटबन येथे भव्य मोफत नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या दोन्ही शिबिरात सुमारे 700 रुग्णांनी लाभ घेतला. यातील 32 रुग्णांना सेवाग्राम येथे मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहे. तर गरजुंना 5 डिसेंबर रोजी चष्मा वाटप केले जाणार आहे.

शनिवारी दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दु. 4 या वेळेत भालर येथील जिल्हा परिषद शाळेत नेत्र चिकित्सा शिबिर पार पडले. या शिबिरात 300 पेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी केली. याशिबिराला भालरसह लाठी, बेसा, कैलासनगर, सुंदरनगर, लालगुडा, मंदर, कुरई, शिरपूर इत्यादी गावातील रुग्ण आले होते. तर रविवारी दिनांक 19 नोव्हेंबर रोजी मुकुटबन येथे बस स्टँड चौक येथील श्री राज राजेश्वर शीव मंदिरात शिबिर पार पडले. यात 387 रुग्णांनी तपासणी केली. या शिबिरात मुकुटबनसह ल. पांढरकवडा, झरी, जामी, बोपापूर, कायर, पाटण, खडकी गणेशपूर, मार्की, अर्धवन, तेजापूर, मांगली. कोडपाखिंडी इत्यादी गावातील रुग्णांनी तपासणी केली.

5 डिसेंबर रोजी चष्मे वाटप – विजय चोरडिया
भालर आणि मुकुटबन येथील शिबिराला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी मी सर्वांचे आभार मानतो. 32 रुग्णांना लवकरच सेवाग्राम येथे शस्त्रक्रियेसाठी पाठवले जाणार आहे. तपासणी झालेल्या रुग्णांचे चष्मे तयार करण्याचे काम सुरू असून येत्या 5 डिसेंबर रोजी चष्मे वाटप केले जाणार आहे. 
– विजय चोरडिया, सामाजिक कार्यकर्ते

रुग्णांची तपासणी कस्तुरबा हॉस्पिटल, सेवाग्रामच्या टीमने केली. सदर शिबिराचे आयोजन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, समाज सेवा हिच ईश्वर सेवा फाउंडेशन व स्व. पारसमलजी चोरडिया फाउंडेशन वणी यांच्या सहकार्यातून करण्यात आले आहे.

Comments are closed.