रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त

गोवारी पार्डी व कुरई येथे शिरपूर पोलिसांची धाड. 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

बहुगुणी डेस्क, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत येणा-या दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर ताब्यात घेतले. या कारवाईत 2 ब्रास रेतीसह सुमारे 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ट्रॅक्टर चालक आणि मालकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

शनिवारी दिनांक 18 नोव्हेंबर रोजी ठाणेदार संजय राठोड यांना खबरीकडून पैनगंगा नदी पात्रातून मोठ्या रेतीची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून शिरपूर पोलिसांचे दोन पथक धडक कारवाईसाठी निघाले. पोलिसांनी एक धाड ही शिंदोला माईन्स जवळील गोवारी पार्डी येथे टाकली. तर दुसरी धाड ही कुरई येथे टाकली. चालकाला ताब्यात घेऊन रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे रेती वाहतुकीचे आवश्यक ते कागदपत्र आढळले नाही.

त्यामुळे पोलीस पथकाने दोन्ही ट्रॅक्टर शिरपूर पोलीस स्टेशन येथे आणले. या कारवाईत एक महिद्रा कंपनीचे एक ट्रॅक्टर ज्याची किंमत 6 लाख रुपये, एक जॉन धीर कंपनीचे ट्रॅक्टर किंमत 5 लाख व 2 ब्रास रेती किंमत 8 हजार असा एकूण 11 लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर आरोपी चालक भिवसन मंगाम, अरविंद बोबडे व ट्रॅक्टर मालक मोहन बोबडे यांच्याविरोधात भादंविच्या कलम 379, 109 व पर्यावरण संरक्षण कलम 15 व महसूल अधिनियम कलम 48 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलीस अधिक्षक पीयूष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संजय राठोड, पीएसआय रामेश्वर कांदुरे, प्रशांत झोड, गंगाधर घोडाम, विजय फुल्लुके, विनोद मोतीराव यांनी केली.

Comments are closed.