बहुगुणी डेस्क, वणी: वणी-यवतमाळ मार्गावरील यवतमाळ रोडवरील चिखलगाव परिसरात एका धावत्या कारला आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कार जळूव खाक झाली. शनिवारी रात्री सव्वा १० वाजताच्या चिखलगाव जवळ ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले व आग आटोक्यात आणली.
प्राप्त माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास फिएट ही कार (MH 01 AL 5833) वणीकडे येत होती. दरम्यान चिखलगाव जवळील रवि गॅरेज समोर काही लोकांना गाडीच्या बोनेटमधून धूर येताना दिसला. लोकांनी याची माहिती ड्रायव्हरला दिली. ड्रायव्हरने तात्काळ कार रस्त्याच्या कडेला उभी करत तो तिथून बाहेर पडला. काही क्षणातच कारमधून आगीचे लोंढे बाहेर येऊ लागले.
घटनेची माहिती फायर ब्रिगेडला देण्यात आली. काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे सागर खडसे, दीपक वाघमारे, टेकाम, देविदास जाधव यांनी परिश्रम घेतले. सदर कार ही दामले नगर येथील एका व्यक्तीची असून चालक ही कार चालवत असल्याची माहिती आहे. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.



Comments are closed.