बोर्डा ते गोधणी रस्त्याची दुरवस्था — जीव मुठीत घेऊन प्रवास
मनसेची रस्ता दुरुस्तीची मागणी, तीव्र आंदोलनाचा इशारा
बहुगुणी डेस्क, वणी: बोर्डा ते गोधणी या मार्गावरील रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वार आणि शालेय विद्यार्थ्यांना दररोज या खड्ड्यांतून मार्ग काढताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने खड्ड्यांमुळे वारंवार अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. ऑटो आणि छोट्या वाहनांना संतुलन राखणे अवघड झाले असून, अनेकदा प्रवाशांना किरकोळ दुखापतीही होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी मनसे तर्फे करण्यात आली आहे.
सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत असून माल वाहतुकीतही अडथळे निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनात रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर मनसेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

निवेदनावर लक्ष्मण उपरे, प्रतीक पानघाटे, निखिल आस्वले, प्रवीण दुमोरे, मंगेश भोयर, रोशन थाटे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. स्थानिक नागरिकांनीही रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीची मागणी केली असून, ‘प्रशासन झोपेत आहे का?’ असा सवाल उपस्थित केला आहे.



Comments are closed.