ज्याला शेतकरी आत्महत्या समजत नाही, तो भाबडा किंवा भामटा: चंद्रकांत वानखडे

'शेतीचे अनर्थकारण' विषयावर व्याख्यान, बळीराजा व्याख्यानमालेची सांगता

0

तालुका प्रतिनिधी, वणी: ‘शेतकरी आत्महत्या का करतो ? हे ज्याला समजत नाही. तो भाबडा किंवा भामटा असला पाहिजे. शेतकऱ्यांची ‘पुंजी’ अन् ‘मार्जिन’ खाऊन जगण्याची क्षमता संपली म्हणून तो आत्महत्या करतो. शेतीला कर्जबाजारीपणाचा ‘एड्स’ झाला आहे. लहान दलाल जाऊन मोठा दलाल आला आहे. एका बी पासून रोप तयार करणारा जन्मदाता हिंसक बनत नाही.’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखडे यांनी केले.

शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात ‘शेतीचे अनर्थकारण’ या विषयावर प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. गजानन सोडनर, प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, युवा उद्योजक किरण दीकुंडवार, सामाजिक कार्यकर्ते शाहिद खान, डॉ. रमेश सपाट, डॉ. किरण सपाट यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी जयंत कुचनकर आणि संगीत संच यांनी जिजाऊ वंदना सादर केली.

ते पुढे म्हणाले की, शेतकरी मूर्ख असल्याच चित्र रंगविल जात. चातुर्वर्ण्यच्या पायरीत शेतकरी शेवटच्या टप्प्यात आहे. परंतु मार्क्सवादी विचार तत्वज्ञानाप्रमाणे शेतकरी हा शेतीचा मालक आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने कुणीही नाही. प्रत्यक्षात परमेश्वरही सोबत नाही. सिनेमा, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत नाही. येथे शेतकरी का मरतो ? याची चर्चाच होत नाही. मात्र डुक्कर, हरीण, वाघ, कोंबडे, पक्षी यांच्या मृत्यूची चर्चा होते. या देशात आजी-माजी सैनिकांना दारू अनुदानात आणि अधिकृत दिली जाते. मात्र शेतकऱ्यांना दारुडा म्हटलं जातं. धननिर्माता निर्धन का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

शेतकरी एका दाण्याचे हजार दाणे करतो. मात्र इथे धनाचा अभाव का ? सध्या बैलाने आणि नांगराने केलेल्या शेतीपेक्षा घोडा आणि बंदुकीने केलेली शेती मोठी आहे. असे त्यांनी ‘शोले’ चित्रपटाचे उदाहरण देत सांगितले. आता कागदी घोडे नाचवून दिल्ली, मुंबई, वाशिंग्टनचे ‘गब्बर’ शेतकऱ्यांना लुटत आहे. शेतीउपयोगी साधनांचे भाव अनियंत्रित आणि शेतमालाचे भाव नियंत्रित ठेवल्या जाते. बाकी धंदे दलालांमुळे फायद्यात तर शेतीचा धंदा दलालांमुळे तोट्यात असतो. असेही ते म्हणाले.

ते शेवटी म्हणाले की, सदानंद देशमुखांच्या कादंबरीत शेतकरी ‘नायक’ होता. मात्र अन्य ठिकाणी तो ‘खलनायकच’ असतो. शेतकऱ्यांना गुणाकारात लुटलं जातं. शेतकऱ्यांची पावलोपावली होणारी लूट पाहून तरुण शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज त्यांनी शेवटी व्यक्त केली’.

प्रा.डॉ. गजानन सोडनर अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, ‘शेतीत अर्थकारण उरलं नाही. तरी शेतकरी लोकांच्या उदरनिर्वाहासाठी शेती करतो.’ दुसऱ्या स्मृतीपुष्पाचे प्रास्तविक अनिल टोंगे यांनी केले. संचालन रवींद्र आंबटकर यांनी केले. विजय दोडके यांनी आभार मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य वणीकरांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी शिव महोत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

हे देखील वाचा:

गांधी मरत नाही. मात्र नथुराम कितीही व्हेंटिलेटरवर ठेवला तरी जगत नाही: चंद्रकांत वानखडे

रेती तस्करी करणारे 3 ट्रॅक्टर मुकुटबन पोलिसांनी केले जप्त

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.