आज सायंकाळी गाजणार वणीत ‘रावणाचा’ डंका
बहुगुणी डेस्क, वणी: ‘रावण’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले ख्यातनाम वक्ते तथा उत्तरप्रदेशचे खासदार चंद्रशेखर यांचे आज व्याख्यान होणार आहे. संत रविदास महाराज जयंतीनिमित्त १४ आणि १५ फेब्रुवारीला वणीत दोन प्रबोधन पर्व आयोजित केले आहेत. पहिले पर्व फुले, शाहू, आंबेडकरी विचारवंत ख्यातनाम वक्त्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी गाजवले. त्यानंतर दुसरे पुष्प चंद्रशेखर आझाद हे शनिवारी गुंफणार आहेत.
राष्ट्रीय चर्मकार महासंघ, वणी, जिल्हा यवतमाळ, संत रविदास प्रबोधन केंद्र व संत रविदास चर्मकार सुधार मंडळ, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम होणार आहेत. आझाद यांचे प्रबोधन पर्व १५ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वाजता वणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील श्री संत रविदास प्रबोधन केंद्रात होईल. तिथूनच सकाळी जयंती उत्सवाची शोभायात्रा सकाळी १० वाजता निघेल. त्यात आश्चर्यकारक देखावे आणि समाजबांधवांचा सहभाग असेल.
सायंकाळच्या सत्रात खासदार चंद्रशेखर आझाद (रावण) यांच्या व्याख्यानाचा लाभ वणीकरांना होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप राहतील, यवतमाळ-वाशिम लोकसभा क्षेत्राचे खासदार संजय देशमुख यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय देरकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, प्रदेश अध्यक्ष माधवराव गायकवाड, राष्ट्रीय प्रवक्ता रवींद्र राजुस्कर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भ अध्यक्ष संबा वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
.
या कार्यक्रमाला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती संत रविदास महाराज प्रबोधन केंद्र, संत रविदास चर्मकार सुधार मंडळ तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भ अध्यक्ष संबा वाघमारे यांनी केले आहे.
Comments are closed.