चिखलगाव परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट; कारवाईची मागणी

मटका, जुगार, अवैध दारू विक्रीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरालगतच्या चिखलगाव परिसरात मटका टपऱ्या, जुगार अड्डे, देशी-विदेशी दारू व गांजाची उघड उघड विक्री सुरु असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर चिखलगाव येथील सौरभ धनेश्वर जोशी यांनी वणी पोलिस ठाण्यात लेखी निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

जोशी यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, चिखलगाव ते लालपुलिया दरम्यान मोठ्या प्रमाणात अवैध मटका, जुगार, देशी दारू व गांजाचा व्यापार बेधडक सुरु आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने निश्चित केलेल्या वेळेपेक्षा खूप आधीच बारमधून विदेशी दारू विक्री केली जात असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले आहे.

या अवैध धंद्यांमुळे परिसरातील गरीब नागरिकांवर अन्याय होत असून, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण केली जात असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. बोधेनगर ते रामदेवबाबा मंदिर परिसरात ये-जा करणाऱ्या सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचेही जोशी यांनी नमूद केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलिस प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हे अवैध धंदे बंद न केल्यास भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Comments are closed.