विलास ताजने, वणी: ‘मेरा साया’ या चित्रपटातील सुनील दत्त आणि साधना यांच ‘तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा..’ हे सर्वांच्याच आवडीचं गीत आहे. माणसाला आयुष्यात अनेक प्रसंगाचा सामना करावा लागतो. अशा वेळी कुणी आपली साथ करो अथवा न करो, मात्र सावली शेवटच्या क्षणापर्यंत आपली सोबत करते. परंतु काही वेळा हीच सावली आपली साथ सोडते. तो दिवस म्हणजेच ‘झिरो शॅडो दिन’ ज्याला शुन्य सावली दिवस ही म्हणतात. आज या खगोलीय चमत्काराचा प्रत्यक्ष अनुभव वणी उपविभागातील गावांत थोरामोठ्यांसह बच्चेकंपनीनेही घेतला.
वणी शहरात 12 वाजून 10 मिनिटांनी, मारेगावला 12•11 वाजता तर झरी मुकुटबनला 12•11 वाजता या सूर्य डोक्यावर आल्यानंतर सावल्या अदृश्य झाल्या. सूर्य डोक्यावर असतो तेव्हा व्यक्ती किंवा वस्तूची सावली बाजूला, मागे, पुढे न पडता पायाखाली पडते. म्हणजे सावली काही क्षण दिसून येत नाही.
शून्य सावली काय आहे ?
दररोज सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी क्षितिजावरची जागा बदलत असते. 23 डिसेंबर ते 21 जून या काळात उत्तरायण असते. नंतर दक्षिणायन सुरू होते. या दरम्यान दोन दिवशी आपण राहतो ते ठिकाण, सूर्य आणि पृथ्वीचा मध्य एका रेषेत येतात. मध्यनाच्या वेळी सूर्य डोक्यावर येतो. त्यावेळी प्रत्येक उभ्या सरळ वस्तूंची सावली बरोबर त्याच्या पायाखाली असते. पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेत लंब नसून कोण साडे तेवीस अंश आहे.
सूर्याचे दक्षिण व उत्तर दिशेने होणारे संक्रमण ही पृथ्वीवरील ऋतुचक्राच्या संदर्भात एक महत्त्वाची घटना आहे. पृथ्वीवर हे संक्रमण दोन वेळा होते. सूर्याचा वार्षिक भासमान भ्रमणमार्ग व आकाशगोलाचे विषुववृत्त यांच्या दरम्यान कोन साडेतेवीस अंश आहे. या दोन्ही पातळ्या जेथे एकमेकांना छेडतात त्या बिंदूस संपतबिंदू म्हटले जाते.