चोपण – कानडा पांदन रस्ता दैनावस्थेत

लोकप्रतिनिधी, स्तानिक नेते, पुढाऱ्यांचे दुर्लक्ष

भास्कर राऊत, मारेगाव: चोपण-कानडा पांदन रस्त्याची दैनावस्था झालेली आहे. या रस्त्याकडे एकाही पुढाऱ्यांचे लक्ष नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात तसेच हिवाळ्यामध्ये या रस्त्याने जनावरे नेणे आणि बैलबंडी नेणे कठीण झाल्याने शेतकरी वर्गाचे मोठया प्रमाणात हाल होत आहे.

या रस्त्यावर पाऊस पडला की मोठया प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य पसरते. काही ठिकाणी तर एक एक फूट चिखल असते. त्यामुळे शेतामध्ये खत, बी बियाणे कसे न्यायचे. निघणारे सोयाबीन घरी कसे आणायचे अशा अनेक समस्या शेतकऱ्यांसमोर निर्माण होत असतात. साधे जनावर जाऊ शकत नाही अशा रस्त्यावरून शेतकऱ्यांना जावे लागते, यापेक्षा शेतकऱ्यांचे दुर्दैव ते कोणते? असेही चोपण येथील शेतकरी वैफल्यग्रस्त होऊन बोलतात.

चोपण-कानडा रस्त्यावर काही वर्षांपूर्वी येथील नागरिकांनी लोकवर्गणी काढून मुरूम टाकण्याचे काम केले होते. परंतु ती तात्पुरती मलमपट्टी होती. या रस्त्यासाठी माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी काही प्रमाणात निधी दिला होता. परंतु त्यानंतर एकाही आमदार किंवा खासदाराने यासाठी निधीचे वितरण केले नाही. जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीनेसुद्धा याकडे लक्ष दिले नाही. आणि गावपुढाऱ्यांनीही तशा प्रकारचा जोर लावलेला नाही.

तालुक्यातील अनेक पांदन रस्त्यांची हिच परिस्थिती
तालुक्यातील अनेक गावातील पांदन रस्ते हे दुर्लक्षित आहे. शासकीय निधीचा योग्य विनिमय होत नसल्याने या पांदन रस्त्याकडे कोणताही नेता लक्ष द्यायला तयार नसतो. मोठे नेते लक्ष देत नसताना गावपुढारीही यासाठी जोर लावताना दिसत नाही. स्वतःच्या घरापुढील किंवा गावातील रस्त्यांपूरतेच हे नेते मर्यादित आहेत की काय असेही वाटून जाते. याआधीही अशीच परिस्थिती होती. ती मात्र बदलतांना दिसत नाही.

Comments are closed.