बहुगुणी डेस्क, वणी: चिखलगाव रोडवर असलेल्या दोन दुकानातून एका तरुणाने 55 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. टायरच्या दुकानातून एका तरुणाने ट्रकचे दोन टायर तसेच एका ऑटोपार्टच्या दुकानात दुरुस्तीसाठी आलेल्या पिकअप वाहनातील बॅटरी व म्युझिक सिस्टिमवर डल्ला मारला. तसेच एका एसयूव्ही कारची काच देखील फोडली. रविवारी दिनांक 2 मार्च रोजी रात्री 11.30 ते 12.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. सदर चोरीचा सीसीटीव्ही फुटेजमधून पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, मुकुंद उत्तमराव बावनकर हे चिखलगाव येथील रहिवासी आहे. ते चिखलगाव रोडवरील रवि मोटार मेकॅनिक ऑटोपार्ट या दुकानात मॅनेजर आहे. तिथे गाड्या दुरुस्तीसाठी येतात. रविवारी दिनांक 2 मार्च रोजी त्यांच्या दुकानात एक पिक अप वाहन दुरुस्तीसाठी आले होते. मात्र दुकान बंद करण्याची वेळ होत पर्यंत पिकअपचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे मॅनेजर रात्री 8 वाजता दुकान बंद करून घरी गेले. त्यांच्या दुकानासमोर दुरुस्तीसाठी आलेल्या गाड्या नेहमी उभ्या असतात. त्यामुळे हे पिकअप वाहन देखील दुकानासमोर उभे होते.
सोमवारी स. 8.30 वाजता मुकंद हे दुकानात आले. दुकानातील मेकॅनिक पिकअप वाहन दुरुस्तीसाठी कॅबिनमध्ये गेले असता त्याला गाडीतील म्युझिक सिस्टिम व बॅटरी चोरीला गेल्याचे लक्षात आले. तसेच दुकानासमोर असलेल्या एका स्कॉर्पिओ गाडीचा काच फुटलेला होता. त्यांच्या दुकानाच्या बाजूलाच एपी टायर नामक टायर विक्रीचे दुकान आहे. दरम्यान या दुकानातील देखील विक्रीसाठी ठेवलेले ट्रकचे 2 टायर चोरीला गेल्याचे त्यांना कळले.
एपी टायर्स या दुकानात सीसीटीव्ही लावलेले आहेत. कॅमे-याची तपासणी केली असता रविवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास अमोल विजय ठाकरे (25) रा. चिखलगाव हा चोरी करताना आढळून आला. आरोपीने बॅटरी (किंमत 10 हजार), म्युझिक सिस्टिम (5 हजार), 2 टायर (40 हजार) असा सुमारे 55 हजारांचा मुद्देमाल लंपास केला तर गाडीचा काच फोडून 5 हजारांचे नुकसान केले. या प्रकरणी आरोपी अमोल विरोधात बीएनएसच्या कलम 303 (2), 324 (4), 324(5) नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
Comments are closed.