महाशिवरात्रीच्या दिवशीच निघाला कोलगावमध्ये नाग
MH29 हेल्पिंग हँड्सच्या सर्पमित्रांनी दिले जीवदान
पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाशिवरात्रीच्या दिवशी कोलगाव (मारेगाव) येथे एका घरी नाग निघाला. या नागाला सर्पमित्रांनी जीवदान दिले. शुक्रवारी दिनांक 8 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास हे बचावकार्य करण्यात आले. एमएच 29 हेल्पिंग हॅन्डसच्या सर्पमित्रांमुळे नागाला जीवदान मिळाले.
दिवसभर सण साजरा केल्यानंतर कोलगाववासी घरी आराम करीत होते. अशातच गावातील धोंगडे यांना त्यांच्या घरी साक्षात नागाने दर्शन दिले. नागाला पाहताच सर्वांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी तात्काळ एमएच 29 हेल्पिंग हॅन्डसचा हेल्पलाईन क्रमांक 9850577616 यावर कॉल करून ही माहिती दिली. त्यामुळे तात्काळ सर्पमित्र, वन्यजीव रक्षक तथा तालुका अध्यक्ष अनिकेत कुमरे यांनी टीमसह घटनास्थ गाठले.
पाहणी केल्यावर तिथे त्यांना अत्यंत विषारी असा कोब्रा म्हणजेच नाग आढळून आले. त्यांनी नागाला कोणतीही इजा न होता शिताफीने पकडून प्लास्टिकच्या बरणीत बंद केले. त्यानंतर त्यांनी गावक-यांना नागाविषयी माहिती दिली. नाग किंवा कोणताही साप हा निशाचर असून बरेच वेळा ते दिवसाही बाहेर पडतात. माणसांची रहदारी ज्या भागात असते असा भाग टाळून ते अन्यत्र भक्ष्य शोधण्यासाठी फिरत असतात. आढळलेला नाग हा उंदर किंवा भक्ष्य शोधण्यासाठी घरात आला असावा, अशी माहिती देत गावक-यांमध्ये जनजागृती केली. नागाला वनविभागाच्या मदतीने जंगलातसोडण्यात आले.
साप निघाल्यास 9850577616 या हेल्पलाईनला कॉल करा
MH29 हेल्पिंग हँडची टीम परिसरात सापांबद्दल जनजागृती करते. परिसरात विविध विषारी आणि बिनविषारी सापांना या टीमने रेस्क्यू करून जीवदान दिले आहे. परिसरात कुठेही साप निघाल्यास किंवा एखादा वन्यजीव आढळल्यास त्याला न मारता 9850577616 या हेल्पलाईनवर कॉल करण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी सर्पमित्र तथा वन्यजीव रक्षक रमेश भादिकर, राजू भोगेकर, अनिकेत कुमरे, रवी नन्नावरे, समीर गुरनुले, आशिष सोनटक्के, नितीन मानुसमारे इत्यादी सर्पमित्र उपस्थित होते.
Comments are closed.