निकृष्ठ कामे करून लाटली पावणे दोन कोटींचे बिले

मारेगाव येथील निकृष्ट  रस्त्या विरोधात आमदारांची तक्रार

0

जितेंद्र कोठारी, वणी: सार्वजनिक बांधकाम विभाग, पांढरकवडा अंतर्गत  मारेगाव नगर पंचायत हद्दीत मे. चिद्दरवार कंस्ट्रक्शन कंपनी यवतमाळ यांनी बांधकाम केलेले रस्ता व भूमिगत गटार बांधकाम निविदा नियमाला डावलून निकृष्ट दर्जाचे झाल्याची लेखी तक्रार वणी विधानसभा मतदार संघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती कडे केली आहे. सदर कामावर होणार खर्च वसूल करून संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची तसेच निकृष्ट कामे असताना एमबी रेकार्ड करून तब्बल 1 कोटी 75 लाख रुपयांची बिले काढणारे अभियंतावर कारवाईची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार मारेगाव नगर पंचायत क्षेत्र अंतर्गत प्रभाग क्र. 1 ते 17 मध्ये रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरण, सिमेंट काँक्रेट रस्ता व भूमिगत गटार निर्मिती साठी सार्वजनिक बांधकाम विभाग पांढरकवडा तर्फे दि.04.06.2018 रोजी ई- निविदा क्र. 76510 ऑनलाइन अपलोड करण्यात आली. सदर कामासाठी रु. 24215232/- निविदा रक्कम ठेवण्यात आली असून हे  कार्य यवतमाळ येथील कंत्राटदार मे. चिद्दरवार कन्स्ट्रक्शन कंपनीला 12 टक्के कमी दरात मिळाले होते. विभागाकडून कार्य सुरू करण्याचे आदेश मिळाल्यानंतर सदर कंत्राटदारानी निविदेतील अटी व  नियमांचे पालन न करता सिमेंट ब डांबरी रस्त्याचे बांधकाम सुरू केले.

निविदेत सिमेंट काँक्रेट M-30 Trimix Treatment या पद्धतीने करणे गरजेचे असता कंत्राटदारांनी Trimix चा वापर न केल्याने 20 वर्ष कालावधी असणाऱ्या रस्त्याची सहा महिन्यात दयनीय अवस्था झाली आहे. तसेच कारारनाम्यानुसार  Hotmix  पद्धतीने डांबरीकरण करण्या ऐवजी Coldmix पद्धतीने कामे करण्यात आले. निकृष्ट कामे असताना विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलेल्या कामाचे खोटे देयके सादर करून कंत्राटदार चिद्दरवार कन्स्ट्रक्शन कंपनीने तब्बल 1कोटी 75 लाख रुपये शासनाकडून लाटली.

बांधण्यात आलेला सदर सिमेंट व डांबरी रस्ता आताच जागोजागी खचून रस्त्याचा सरफेस पूर्णपणे उखडल्याची  तक्रार मारेगाव येथील नागरिकांनी आमदारांकडे केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने आमदार बोदकुरवार यांनी 20 मे रोजी अधीक्षक अभियंता यवतमाळ व कार्यकारी अभियंता सा. बा. विभाग पांढरकवडा यांच्यासह सदर रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीत रस्त्याची जाडी इस्टीमेटमध्ये नमूद 150 मि.मी. पेक्षा कमी  आढळली. सिमेंट रस्त्याचा भूपृष्ठावरील सरफेस जागोजागी उखडून खड्डे पडल्याचे दिसले. पाहणीत अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार व कार्यकारी अभियंता प्रकाश बुब यांनी झालेले काम अत्यन्त निकृष्ट असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे झालेला रस्ता पूर्ण खोदून संबंधित कंत्राटदारांकडून नव्याने बांधण्यात यावे. कंत्राटदारांनी हयगय केल्यास त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम वसूल करण्यात यावी व त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. अशी मागणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.

उप अभियंतानी स्वतः रेकार्ड केले बिल

चिद्दरवार कन्स्ट्रक्शन कंपनीने केलेलं कामाची गुणवत्ता अतिशय खराब असल्यामुळे संबंधित कनिष्ठ अभियंता (J.E.) नी  एम. बी. रेकार्ड करण्यास नकार दिला. त्यामुळे मारेगाव सा.बा. विभाग उप अभियंत्यांनी त्यांच्याकडून काम काढून दुसऱ्या जेई कडे सोपविले. नेमणूक झालेला दुसरा कनिष्ठ अभियंता रजेवर गेल्यामुळे उप अभियंत्यांनी स्वतः मोजमाप रजिस्टर (Measurements Book ) तयार करून कंत्राटदारचे बिले काढून दिल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.