कॉ. शंकरराव दानव यांनी पीडित, वंचित, शोषित वर्गाला न्याय मिळवून दिला
त्यांच्या प्रथम स्मृतिदिनात वक्त्यांनी दिला आठवणींना उजाळा
बहुगुणी डेस्क, वणी: चळवळीचे भूषण असलेले दिवंगत कॉम्रेड शंकरराव दानव यांनी तहहयात पीडित, वंचित, शोषित वर्गाला न्याय मिळवून दिला. त्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. कष्टकऱ्यांच्या संघटना बांधून त्या बळकट केल्यात. त्यांच्यासाठी निरंतर संघर्ष केला. अशा अनेक आठवणींना त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाला वक्त्यांनी उजाळा दिला. कळंब तालुक्यातील पालोती( मेटीखेडा ) येथे त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाला या निमित्त विशेष मेळावा झाला. यावेळी वक्त्यांनी कॉ. दानव यांची संघर्षगाथा मांडली.
यावेळी कॉ. दानव यांचे अनेक ज्ञात, अज्ञात पैलू वक्त्यांनी उलगडलेत. दानव यांचा जिल्ह्यातील सर्वच गावांत दांडगा संपर्क होता. प्रत्येक गावातील शोषितांच्या वेदना ते जाणून घेत. पोड असो, तांडा असो किंवा पारध्यांची वस्ती असो ते सातत्याने त्यांचा भेटीगाठी घेत. त्यांचे प्रश्न जाणून घेत. त्यांना त्यांचा समस्यांवर मात करण्यासाठी संघर्षासाठी तयार करीत.
शेवटच्या श्वासापर्यंत ते संघर्षरत होते. त्यांची ही विशिष्ट शैली व विचार कम्युनिस्ट पक्षाचा मार्क्सवादी विचारातून आली. त्यांनीं आपले अनमोल आयुष्य स्वतःचा स्वार्थ न बघता पीडित, वंचित, शोषित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी वेचले. मार्क्सवादी वैचारिक जाणिवेतून त्यांचा जगाकडे पाहण्याचा एक उत्तम दृष्टिकोन निर्माण झाला होता. तो दृष्टिकोन त्यांनी आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातील कार्यकर्त्यांना दिला. त्यांचा हाच वैचारिक पाया मजबूत करीत यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकर्ते त्यांचे कार्य पुढे चालू ठेवतील व कष्टकऱ्यांची बाजू मजबूत करीत संघर्ष सुरू ठेवतील. असा आशावाद उपस्थितांनी व्यक्त केला.
या मेळाव्याचा अध्यक्षस्थानी कॉ. सदाशिव आत्राम होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. कुमार मोहरमपुरी, कॉ. डी. बी. नाईक, किसान सभेचे राज्य सदस्य कॉ. दिलीप परचाके, किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. चंद्रशेखर सिडाम, किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ. देविदास मोहकर, कॉ. अनिता खूनकर, आशा वर्कर संघटनेच्या जिल्हा सचिव कॉ. उषा मुरखे, कॉ. मनीष इसाळकर, कॉ. निरंजन गांधलेकर, कॉ. रमेश मिरासे, कॉ. कवडू चांदेकर, सरिता दानव आदी उपस्थित होते.
यावेळेस कॉ. शंकरराव दानव यांचा पत्नी कलावतीबाई दानव ह्यासुद्धा प्रामुख्याने उपस्थित होत्या. ह्या मेळाव्यात जिल्ह्यातील अनेक गावांतील नागरिक तथा कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी कळंब तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
Comments are closed.