गाडी जप्त केल्याने त्याचे प्रशासनाच्या वाहनपुढे लोटांगण

भगतसिंग चौकात रंगले व्यावसायिक व प्रशासनात नाट्य

0

विवेक तोटेवार, वणी: आज गुरुवारी दीपक चौपाटी परिसरात एक मास्क विक्री करणाऱ्या व्यावसायिकाची हातगाडी मालासह नगर परिषद पथकाकडून जप्त करण्यात आली. त्याची हातगाडी तहसीलमध्ये नेत असतानाच तो व्यावसायिक प्रशासनाच्या वाहना समोर आला व अधिका-यांच्या वाहनासमोर लोटांगण घालून निषेध केला. सदर घटना सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. सुमारे 1 तास हे नाट्य रंगले. 

सविस्तर वृत्त असे की, दादाजी पोटे हे लॉकडाऊन असल्याने दीपक चौपाटी परिसरात मास्क विक्रीचा व्यवसाय करतात. ते यवतमाळ जिल्ह्याचे माहिती अधिकारी संघटक व प्रचारक आहेत. गुरुवार सकाळी 10 वाजताच्या सुमारास नगर परिषदेचे जप्ती पथक त्यांच्या हातगाडीसमोर आले व त्यांनी पोटे यांना गाडी हटविण्यास सांगितले.

काही वेळ झाला तरी पोटे यांनी गाडी हटविली नाही. तेव्हा नगर परिषद जप्ती पथकाने त्यांची हातगाडी मालासह जप्त केली. त्यांचे वाहन प्रशासन तहसील मध्ये घेऊन जात होते. दरम्यान पोटे हे ट्रॅक्टरच्या मागे जात असतांनाच काठेड ऑइल मिल जवळ तहसीलदारांची गाडी त्या ठिकाणी आली.

पोटे यांनी आम्ही गरिबांनी कसे जगावे, काय करावे असा प्रश्न उपस्थित करीत आम्हाला मारून टाका म्हणत ते चक्क तहसीलदारांच्या गाडीसमोर झोपले. यावेळी उपस्थितांनी व तहसीलदारांनी त्यांची समजूत काढली व वाद मिटविला. हा सर्व ड्रामा तब्बल एक तास सुरु होता. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला बळजबरीने उचलून पोलीस वाहनात बसविले. मात्र काही वेळाने त्यांची गाडी मालासह परत दिल्याची माहिती आहे.

नियमांचे उल्लंघन करून दुकाने उघडणारे मोठ्या व्यवसायिकाविरुद्द कारवाई होत असताना नागरिक प्रशासनाचे समर्थन करताना दिसत आहे. मात्र फुटकर व किरकोळ व्यापाऱ्यांवर कारवाई करीत असताना पथकातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना निष्ठुर व मुजोर ठरविले जात आहे. दोन दिवसांपूर्वी टिळक चौकात भाजी विक्रेत्यांनी स्वतः आपले ठेले उलटून कारवाईचा विरोध केला होता. शहरात कोरोना रुग्णाची संख्या कमी होत असताना मात्र नागरिकांची बेपरवाही वाढलेली दिसत आहे.

हे देखील वाचा:

हिमांशुजी बतरा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Leave A Reply

Your email address will not be published.