थरार… वणीतील वृद्ध दाम्पत्याच्या कारवर दरोडा… चालकाला बेदम मारहाण…

1.5 लाखांचे सोने व रक्कम लुटल्याची माहिती.... चालकाची नग्न अवस्थेत पोलीस चौकीकडे धाव...

जितेंद्र कोठारी, वणी: नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जाऊन नागपूरहून वणीला परत येत असताना जाम्बजवळ वणीतील एका वृद्ध दाम्पत्याच्या कारवर दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी दरोडा टाकला. या प्रकरणी चालकाला जबर मारहाण करून दाम्पत्याचे दागिने व रोख रक्कम लुटल्याची माहिती आहे. बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. दरोडेखोरांनी दोन ते तीन गाड्या 15 मिनिटांत लुटल्या असून यातील दुसरी गाडी ही जांब येथील असून तिसरी गाडी पंक्चर अवस्थेत वरो-याच्या दिशेने पुढे निघून गेल्याची माहिती आहे. तेजकरण पालीवाल. (73) रा. आनंद नगर वणी व पुष्पा पालीवाल (68) असे वृद्ध दाम्पत्याची नाव असून आतिब खान (22) असे कार चालकाचे नाव आहे. 

सविस्तर वृत्त असे की वणीतील एक सेवानिवृत्त शिक्षक (73) यांच्या मध्यप्रदेश येथील एका नातेवाईकांचे दोन दिवसांआधी निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराला जाण्यासाठी त्यांनी वणीतील एका कार भाड्याने घेतली. मंगळवारी ते चालक (वय अंदाजे 22) रा. शास्त्रीनगर वणी व पत्नी (वय 68) यांच्यासह मध्यप्रदेश येथील एका गावात अंत्यसंस्कारासाठी गेले होते. बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार आटपून ते रात्री 10 वाजताच्या सुमारास नागपूर येथे पोहोचले. तिथे मुलाकडे जेवण करून रात्री 12.30 वाजताच्या सुमारास ते नागपूरहून वणीसाठी निघाले.

रात्री 2 वाजताच्या सुमारास वरोरा रोडवर जांब पासून 3 किलोमीटर अंतरावर हायवेवर लाडकाचे फाटे टाकून रस्ता ब्लॉक करून होता. तिथे काही दरोडेखोर आधीच दबा धरून बसले होते. वणीतील दाम्पत्याची गाडी पोहोचताच 7 ते 8 दरोडेखोरांनी कारजवळ जाऊन कार चालकाला ओढून बाहेर काढले. एकाने गाडी पंक्चर केली. मागे बसलेले वृद्ध दाम्पत्यालाही त्यांनी धमकावून बाहेर काढले व त्यांच्या जवळील दागिने हिसकले. ड्रायव्हलाही मारहाण केली. 

चालकाला नग्न करून मारहाण
दुसरी गाडी ही जाम्ब येथील असल्याची माहिती आहे. दरोडेखोरांनी त्या गाडीतील चालक व सहप्रवाशाला बेदम मारहाण करून त्याच्या अंगावरचे सर्व कपडे काढले. त्यांच्या शर्टने हात तर पँटने चालकाचे पाय बांधून त्याला नग्न अवस्थेत रस्त्याजवळील शेतात टाकून दिले. वणीतील गाडीचा चालक यालाही कपडे काढून नग्न होण्यास सांगितले, मात्र त्याने नकार दिला असता त्यालाही बेदम मारहाण केल्याची माहिती आहे.

चालकाची नग्न अवस्थेत पोलीस चौकीकडे धाव…
जाम्ब येथील चालकाला हात पाय बांधून शेतात टाकल्यानंतर त्याने प्रयत्न करून बांधलेले पाय सोडवले व तिथून त्याने नग्न अवस्थेतच जाम्ब पोलीस चौकीकडे धाव घेतली. पोलीस चौकीत पोहोचताच त्याने उपस्थित असलेल्या पोलिसांना याची माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी त्याला घालायला कपडे दिले व ते त्वरित घटनास्थळी रवाना झाले. दरोड्यानंतर 15 मिनिटातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा वणीतील दाम्पत्य व चालक यांना त्यांच्या गाडीतून बाहेर काढून जाम्ब येथील लुटलेल्या गाडीत डांबण्यात आले होते. तिसरी गाडी ही पंक्चर केल्यानंतर चालकाने पंक्चर अवस्थेतच गाडी तिथून काढल्याची माहिती आहे. वणीतील दाम्पत्याचे सुमारे 1.5 लाखांचे दागिने व काही रोख रक्कम लुटल्याची माहिती आहे. या प्रकरणी समुद्रपूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सावधान… दरोडेखोरांची दहशत
24 तास सुरू असणा-या नागपूर-चंद्रपूर हायवेवर ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. वणीहून मोठ्या प्रमाणात व्यापारी तसेच प्रवासी नागपूरला जातात व रात्री नागपूरहून परत येतात. 24 तास या रस्त्यावर रहदारी असल्याने कुणीही मनात भीती न बाळगता या रस्त्यावरून प्रवास करतात. मात्र दरोड्याची ही घटना समोर आल्याने नागपूरला जाणारे प्रवासी दहशतीत येण्याची शक्यता आहे. आता या दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

हे देखील वाचा:

पत्रकार जब्बार चीनी यांना ‘मूकनायक’ पत्रकारिता पुरस्कार जाहीर

Comments are closed.