अखेर आमदारांच्या शिष्टाईने 11 दिवसांनी उपोषणाची सांगता

खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत दिव्यांग महिलेचे सुरू होते उपोषण

0

भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या 11 दिवसांपासून सीमा अफरोज खान यांचे मारेगाव पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू होते. अखेर आमदारांच्या शिष्टाईने आज दुपारी उपोषणाची सांगता झाली. उपोषणकर्त्या सीमा अफरोज खान यांनी मारेगाव पोलिसांनी चुकीच्या कारवाईत फसवून शिविगाळ केल्याचा आरोप करत उपोषण सुरू केले होते.

दि.23 जून रोजी मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार जगदीश मंडलवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी करणवाडी येथील एका घरी धाड टाकीत दारूच्या बॉटल अंथूरणामधून जप्त केल्या होत्या. या प्रकऱणी दारूचा अवैध व्यवसाय करण्याच्या आरोपावरून दिव्यांग महिला सीमा अफरोज खान व तिचे पती अफरोज खान यांच्यावर कारवाई केली होती. मात्र सदर कारवाई चुकीची असून मला अपंग असतानाही शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचा आरोप करत सीमा अफरोज खान हीने तिच्या पतीसह उपोषण सुरू केले होते.

उपोषणावरून रंगला कलगीतुरा
6 जुलैपासून सीमा या ठाणेदारांविरोधात उपोषणाला बसल्या. त्यानंतर 9 जुलैला करणवाडी येथील काही ग्रामस्थांनी सदर कारवाई योग्य असल्याचा दावा केला. तसेच अवैध दारूविक्री बाबत ठाणेदारांची कारवाई योग्य असल्याचे निवेदन दिले होते. तर दिनांक 14 जुलै रोजी सीमा यांच्या समर्थनात काही गावक-यांनी निवेदन देत न्याय द्यावा अशी मागणी केली होती. या एकमेकां विरोधातील निवेदन युद्धाची तालुक्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता.

आज दि. 15 जुलैला आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी या आंदोलनाची दखल घेत उपोषण कर्त्याची समजूत काढत आणि तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन देत उपोषण संपविण्यासाठी यशस्वी शिष्टाई केली. त्यांच्या शिष्टाईने उपोषणकर्त्या सीमा अफरोज खान यांनी उसाचा रस प्राशन करीत उपोषण संपविले.

यावेळी नायब तहसिलदार गोहोकर, भाजपचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, प्रशांत नांदे, देवा बोबडे, अफरोज खान यांच्यासहित अनेक नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.