जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील पुरड (नेरड) येथे भरदिवसा धाडसी घरफोडी झाली. यात चोरट्यांनी 2 लाखांचा ऐवज लंपास केला. गुरुवारी ही घटना घडली. भरदिवसा छोट्या गावात चोरी झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र शिरपूर पोलिसांनी या घरफोडीबाबत तत्परता दाखवत तात्काळ तपासचक्रं फिरवली व अवघ्या काही तासांमध्ये चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. अमोल सोमेश्वर भटवलकर (32) व प्रफुल्ल देविदास मोहितकर (26) रा. पुरड असे आरोपींची नावे आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अवघ्या दोन ते तीन तासात शिरपूर पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावल्याने शिरपूर पोलिसांचे कौतुक होत आहे.
सविस्तर वृत्त असे की देवराव मारोती थेरे (44) हे तालुक्यातील पुरड (नेरड) येथील रहिवासी आहे. त्यांची मुकुटबन रोडवरील हिवरदरा शिवारात शेती आहे. गुरुवारी दिनांक 24 ऑगस्ट रोजी ते त्यांचा मुलगा व त्यांची पत्नी नेहमीप्रमाणे शेतीच्या कामासाठी गेले होते. जाताना त्यांनी घराच्या दरवाज्याला व घराच्या कम्पाउंडच्या गेटला कुलूप लावले. तर त्यांची मुलगी ही कॉलेजच्या कामासाठी सकाळी नागपूरला गेली.
दुपारी 4 वाजताच्या सुमारास त्यांचा मुलगा शुभम (20) हा शेतातून घरी परत आला. त्याला घराच्या कम्पाउंडला लावलेले कुलूप तुटलेले आढळले. त्याने घरात जाऊन पाहिले असता घरातील सामान अस्तव्यस्त व कपाट उघडे असल्याचे दिसले. त्याने तातडीने याची माहिती त्याच्या वडिलांना दिली. घरफोडी झाल्याचे कळताच देवराव त्यांच्या पत्नीसह घरी परत आले.
त्यांनी घरातील कपाट चेक केले असता त्यांनी शेतीच्या कामासाठी ठेवलेली 15 हजाराची रोख रक्कम व सोन्याचे दागिने आढळले नाही. त्यांच्या घरून चोरट्यांनी सोन्याचे मंगळसूत्र, गोप, नेकलेस, अंगठी, कानातील बिरी असा एकूण 37 ग्राम सोन्या चांदीचा ऐवज ज्याची किंमत सुमारे 1 लाख 85 हजार व 15 हजार रोख रक्कम असा 2 लाखांचा ऐवज चोरून नेला. देवराव यांनी तातडीने शिरपूर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार नोंदवली.
अवघ्या काही तासात प्रकरणाचा छडा
भर दुपारी एका छोट्या गावात घरफोडी झाल्याने गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सकाळपासूनच आपले तपासाचे चक्र फिरवले. दिवसाढवळ्या चोरी झाल्याने चोर गावातीलच असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांनी गावातील 4-5 संशयीतांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यातील अमोल सोमेश्वर भटवलकर (32) व प्रफुल्ल देविदास मोहितकर (26) रा. पुरड या दोघांनी गुन्हा कबूल केला. दुपारी 11.45 वाजता त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कम व सोनेचांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले.
शिरपूर पोलिसांनी अवघ्या दोनतीन तासात आरोपीला अटक केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. सदर कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड, अ.पो.अधिक्षक पीयूष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गजानन करेवाड, रामेश्वर कांडुरे, अनिल सुरपाम, आशिष टेकाडे, राजन इसनकर, अभिषेक कोषटवार, सुगत दिवेकर, नीलेश भुसे, गजानन सावसाकडे, प्रशांत झाडे, पल्लवी बलकी यांनी पार पाडली.
Comments are closed.