बहुगुणी डेस्क, वणी: वणीकरांसाठी खर्रा ही काही मोठी किंवा विशेष गोष्ट नाही. अनेक जण खर्रा खातात आणि खिलवतातही. काहींची उधारीही चालते. मात्र खर्ऱ्यासारख्या शुल्लक बाबीवरून कुणाचं गंभीर नुकसान होईल याची कल्पनाही करवत नाही. मात्र अशीच एक घटना लालगुड्यातील डी. डी. बारच्या मागील महावीर सिमेंट वर्कजवळ असलेल्या रोडवर बुधवार दिनांक 12 मार्चला रात्री 9.00 वाजण्याच्या सुमारास घडली.
लालगुडा येथील पटवारी कॉलनीतील फिर्यादी प्रदीप विनायक नागतुरे (42) आणि आरोपी सूरज बाबाराव चालतुरे (38) व अविनाश उर्फ गोचा धुर्वे (35) यांच्यात खर्ऱ्याच्या पैशांवरून वाद झाला. विशेष म्हणजे यातील फिर्यादी व आरोपी हे एकाच मोहल्यात राहतात. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ सुरू केली. हा वाद नंतर विकोपाला गेला. मग आरोपींनी फिर्यादीला लोखंडी सळाखीने मारहाण करणे सुरू केले. या मारहाणीत फिर्यादीचा डावा पाय जखमी होऊन फ्रॅक्चर झाला.
जर कुणाला हे सांगितलं तर ‘तुला खतम करून टाकतो’ अशी धमकी दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात कलम 118 (2), 352, 351 (2), 351 (3) अन्वये गुन्हे दाखल झालेत. पुढील तपास पोउपनि धनंजय रत्नपारखी पोलीस स्टेशन वणी करीत आहेत.
Comments are closed.