जब्बार चीनी, वणी: शहरातील लोढा हॉस्पिटल येथे सुरू करण्यात आलेल्या डेडिकेडेट कोविड हॉस्पिटलचे मंगळवारी दिनांक 29 सप्टेंबर रोजी उद्घाटन झाले. उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांच्या हस्ते या हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. तालुक्यातील हे एकमेव डे़डिकेटेड हॉस्पिटल असून यात कोरोना रुग्णांवर शासकिय दरानुसार सर्व प्रकारचे उपचार केले जाणार आहे. तालुक्यात कोविड हॉस्पिटल सुरू झाल्याने परिसरातील कोरोना रुग्णांना आता स्थानिक ठिकाणीच मल्टिस्पेशालिटी सेवा मिळणार आहे.
या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी जनरल वार्ड आणि सेपरेट रूम अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक बेडला ऑक्सिजन व्हेंटीलेटरची सुविधा तसेच गंभीर रुग्णांसाठी आयसीयू, सीटीस्कॅनसारखी सुविधाही दिली जाणार आहे. हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य कोरोना रुग्णासह पॉजिटिव्ह असलेल्या गर्भवती महिला, अपघात झालेले पॉजिटिव्ह व्यक्ती, पॉजिटिव्ह असलेले नवजात बाळ, शस्त्रक्रिया तसेच इतर गंभीर आजारांवरील रुग्णांवर उपचार केला जाणार आहे. वणी व नागपूर येथील डॉक्टरांची टीम कोरोना रुग्णांना सेवा देणार आहे.
कोरोना टेस्टिंग लॅबची निर्मिती
डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये कोरोना टेस्टचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत रॅपिड ऍन्टिजन टेस्ट तर दुपारी 12 ते दुपारी 2 दरम्यान आरटीपीसीआर टेस्ट करता येणार आहे. टेस्ट देखील शासकीय दरानुसार केली जाणार आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे केवळ मोजक्या लोकांमध्येच हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, संजय देरकर, राजू उंबरकर, जयसिंग गोहोकर, ओम ठाकूर, सुरेश काकडे तसेच डॉ. महेंद्र लोढा, डॉ. गणेश लिमजे यांच्यासह हॉस्पटलचे कर्मचारी व डॉक्टर उपस्थित होते. आधी कोरोनाच्या गंभीर रुग्णांना उपचारासाठी नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अदिलाबाद इत्यादी ठिकाणी जात होते. मात्र आता शहरातच डेडिकेटेड मल्टिस्पेशालिटी कोविड हॉस्पिटल सुरू झाल्याने रुग्णांची परवड थांबणार आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)