विरोधकांच्या मवाळ भूमिकेमुळेच विकासाचे तीनतेरा

सत्ताधाऱ्यांना सुगीचे दिवस, तर विरोधी सोशल मीडियावर मशगुल

0

रवि ढुमणे, वणी: वणी विधानसभा तसेच पालिकेतील विकास कामे अथवा समस्यांचे निराकरण करण्याची नैतिक जबाबदारी जितकी सत्ताधाऱ्यांची आहे तितकीच विरोधकांची आहे. सत्तेत एका राजकीय पक्षाची सत्ता असताना मात्र विरोधक केवळ सोशल मीडियावर मशगुल आहेत. परिणामी विधानसभा मतदार संघ व शहर समस्यांचे आगर बनत चालले आहे. तर विरोधकांच्या मवाळ भूमिकेमुळेच परिसराचा विकास खुंटलेला दिसत आहे.

सध्या वणी विधानसभा, लोकसभा, नगर परिषद, पंचायत समितीमध्ये भाजपाची सत्ता आहे. लोकांनी निवडून दिलेले भाजपचे लोकप्रतिनिधी केवळ नेत्यांच्या नावावर मिरे वाटत फिरताना दिसत आहे. मग येथील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न असो की, शेतमालाच्या भावाचा, जो तो केवळ आश्वासनांची खैरात वाटताना दिसत आहे.

शहरात दूषीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य पसरले होते. याबाबत नागरिकांनी पालिकेवर धडक देत कैफियत मांडली होती. तर दुसरीकडे पंचायत समितीच्या बीडीओंनी चक्क जावई शोध लावत चिखलगाव येथील लेआऊटमध्ये शासकीय काम सुरू असून सदर भाग वणी नगर परिषद मध्ये गेल्याचे फर्मान सोडत ग्रामपंचायतीला नोटीस बजावली होती. हा प्रकार कुरघोडीच्या राजकारणातून करण्यात आला होता. या संबंधी वणी बहुगुणीने बातमी सुद्धा प्रकाशित केली होती. यावरून सत्ताधारी केवळ राजकारण करीत असल्याचे स्पष्ट होते.

वणी विधानसभा मतदारसंघात तर समस्यांचा डोंगरच आहे. स्थानिक पदाधिकारी केवळ भूमिपूजन करण्यात धन्यता मानत आहे. कर्जमाफीचे अर्ज भरताना शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी, अकरावीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न ज्वलंत असताना येथेही राजकारणाची ठिणगी पडली. या मतदार संघाचे पालकत्व असलेल्या लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे जणू काही दुर्लक्ष केल्याचे जाणवले.

सत्ताधारी आपल्या मनमानी कारभाराने सत्ता चालवत असताना निवडणुकीत पराभूत झालेले राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मात्र गप्पच असल्याचे दिसून आले. सत्ताधाऱ्या विरुद्ध रणशिंग फुंकून जनतेला न्याय देण्याऐवजी मवाळ भूमिका बजावून सत्ताधा-यांना एकप्रकारे मदत कताना दिसत आहे. एकीकडे ज्वलंत प्रश्न व त्याला वाचा फोडणारा वाली नाही. पण जेव्हा निवडणुका येतात आणि जनता जनार्धन विरोधकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. पण त्या खंबीर जनतेसाठी लढणारे पुढारी मात्र संकटात बघ्याची भूमिका वठवीत असल्याने सत्ताध्याऱ्यांचे चांगभलं होताना दिसत आहे.

सत्तेत नाही म्हणून प्रश्न उचलणार कसे, असे प्रश्न करणारे पुढारी मवाळ भूमिका घेत असल्याने परिसराच्या विकासाला जणू खिळच बसली आहे. या विरोधकांच्या मवाळ भूमिकेमुळे सत्ताधारी मनमानी करीत असल्याचे दिसत असून याचा फटका मात्र सामान्य जनतेला बसत आहे.

सोशल मीडियावर मशगुल असणारे पुढारी जनतेच्या हितासाठी कधीच रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले नाही. तर सत्तेत असलेले लोकप्रतिनिधी निव्वळ आश्वासनाची खैरात वाटताना दिसत आहे. सत्तेच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांना गतिरोधक नसल्याने त्यांची राजकीय गाडी मात्र धूम पळायला लागली आहे. एकूणच दोन हाणा पण पुढारी म्हणा अशी काहीशी अवस्था वणी परिसरात बघायला मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.