लॉकडाऊनमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी सोडून घरी आला आणि सरपंच झाला
ढाकोरी (बोरी) च्या नवनिर्वाचित तरुण सरपंचाची अनोखी कहाणी...
निकेश जिलठे, वणी: कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनने अनेकांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अनेकांचे आयुष्य लॉकडाऊनने बदलवले. ढाकोरी येथील एक तरुण स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी जळगाव येथे गेला होता. तिथे तीन वर्षांपासून तयारी सुरू होती. काही प्रमाणात यशही मिळाले. मात्र लॉकडाऊन लागल्यानंतर क्लास बंद झाल्याने तो तरुण गावी आला. त्यातच ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले. हा तरुण निवडणुकीत उभा राहिला आणि आज सरपंच देखील झाला. अजय पांडुरंग कवरासे असे या 25 वर्षांच्या नवनिर्वाचित सरपंचाचे नाव आहे. वणी तालुक्यातील कोरपना मार्गावर जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या ढाकोरी (बोरी) या गावाचा अजय सरपंच झाला आहे.
अजयने वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयातून ग्रॅच्युएशन पूर्ण केले. त्यानंतर त्याने प्रशासकीय विभागात जाण्याचे ठरवले. त्यासाठी अजयने वणीतील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची काही दिवस तयारी केली. दरम्यान त्याला जळगाव येथील एमपीएससी क्लासबाबत माहिती मिळाली. पुढील तयारीसाठी तो जळगाव येथे गेला. 3 वर्षांपासून तिथे तो स्पर्धा परीक्षेची पूर्ण वेळ तयारी करत होता. कधी एक गुण तर कधी दोन गुण कमी पडल्याने यशाने त्याला हुलकावणी दिली.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन लागले. क्लास बंद झाल्याने अजयने गावी परत येण्याचा निर्णय घेतला व घरीच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. दरम्यान गावात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले. अजयच्या मित्रांनी व वार्डातील लोकांनी त्याला राजकारणात उतरण्याचा सल्ला दिला. मात्र अजयने त्यास नकार दिला. परिसरातील लोकांनी गावाचा विकास करण्यासाठी शिकलेल्या तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे अशी त्याची मनधरणी केली. दरम्यान स्पर्धा परीक्षा देखील पुढे ढकलली गेली होती. अखेर अजयने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.
ढाकोरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून ग्रामविकास पॅनलतर्फे अजय उभा राहिला. मित्र आणि वार्डातील सहकारी कामाला लागले. निवडणुकीत अजयने प्रतिस्पर्धाचा धुंवाधार पराभव करत 50 पेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला. त्याच्या पॅनलने सत्ताधारी प्रतिस्पर्धी गटाचा पराभव करीत 7 पैकी 4 जागा मिळवत बहुमत मिळवले. सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण गटासाठी राखीव आले. त्यामुळे पॅनलने अजयचेच नाव सरपंचपदासाठी पुढे केले. अखेर 22 फेब्रुवारी ग्रामविकास पॅनलचे अजय पांडुरंग कवरासे यांची सरपंचपदी तर उपसरपंच शारदा अनंता शेंडे यांची अविरोध निवड झाली.
गावात सोयी सुविधा पुरवणे हेच ध्येय – अजय कवरासे
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास बाजूला सोडून राजकारणात उतरणे हा निर्णय कठिण होता. मात्र गावकरी व मित्रमंडळी यांचे बळ, प्रेम, सहकार्य आणि विश्वास यामुळे या पदावर पोहोचता आले. गावाचा विकास करणे हेच पुढे ध्येय राहिल. गावात वाचनालय सुरु करण्याचा मानस आहे. याशिवाय शिक्षण, आरोग्य इत्यादी सोयी सुविधेसाठी वैयक्तिक तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणार.
– अजय कवरासे, नवनिर्वाचित सरपंच ढाकोरी (बोरी)
ही निवडणूक ग्रामविकास पॅनलने दशरथ मांडवकर, तुळशीराम मालेकार, दिवाकर कवरासे, मंगेश भगत, मारोती निमकर, दिवाकर काळे इ. यांच्या मार्गदर्शनात लढली. त्यांना तरुणांनी व गावातील सर्वसामान्य नागरिकांनी साथ दिली. ढाकोरी (बोरी) ग्रामपंचायतमध्ये रुपाली शामसुंदर खाडे, वंदना बंडू हनमंते, निनाद काकडे, गणेश टेकाम, लता लसंते हे सदस्य आहेत.
हे देखील वाचा: