धर्माधिष्ठित राष्ट्राची संकल्पना ही फोल आणि विघातक: ज्ञानेश महाराव

बळीराजा व्याख्यानमालेला सुरुवात, आज संध्या 7 वाजता 'शाहिराची लोकशाही' या विषयावर व्याख्यान

निकेश जिलठे, वणी: मुळात हिंदूराष्ट्र निर्माण हा एक राजकीय विषय आहे. आरएसएस जी धर्माधिष्ठित राष्ट्राची संकल्पना मांडत आहे ती संकल्पनाच फोल आहे. ज्या राष्ट्रांनी असा प्रयत्न केला, तो अयशस्वी झाला असून देशासाठी विघातक ठरला आहे, असा घाणाघात ज्येष्ठ विचारवंत आणि संपादक ज्ञानेश महाराव यांनी केला. वणी येथील बळीराजा व्याख्यानमालेत ‘फक्त राष्ट्राभक्तांसाठी’ या विषयावर ते बोलत होते. शुक्रवारी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी बळीराजा या दोन दिवशीय व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. या व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. शहरातील बाजोरीया लॉनमध्ये ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. आज शनिवारी संध्याकाळी 7 वाजता ‘शाहिराची लोकशाही’ या विषयावर ज्ञानेश महाराव आपले विचार मांडणार आहेत.

राष्ट्र हे भौगोलिक नकाशावरून नाही तर विचारावरून ठरते. धर्मांधता ही कोणत्याही राष्ट्रासाठी फायद्याची नाही. जगात अनेक राष्ट्रांनी धर्माच्या आधारावर राष्ट्र निर्मितीचा प्रयत्न केला. मात्र तो फोल आणि विघातक ठरला. अनेक मुस्लिम बहुल राष्ट्रांनी मुस्लिम राष्ट्राचा पुरस्कार केला. मात्र तो धोकादायक ठरला. अनेक देशात बौद्ध किंवा ख्रिश्चन बहुल लोक राहतात. मात्र ते याचा कधीही डंका न वाजवता देशात लोकशाही आणि सर्वधर्मसमभावाला महत्त्व देतात. त्यामुळे असे देश आज प्रगतीपथावर आहे. असे मत ज्ञानेश महाराव यांनी मांडले.

छ. शिवाजी महाराज ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र ही संकल्पना मांडताना फक्त मानवी मुल्याला महत्त्व दिले. हे राष्ट्र माझं आणि माझ्या कल्याणासाठी आहे, मानवी मुल्य हेच स्वराज्य  अशी मांडणी आपल्या महापुरुषांनी केली. मात्र आज केवळ भांडवलवाद, धर्मांधता याला राष्ट्रनिर्मितीत महत्त्व दिले जात आहे. हे देशाला अधोगतीला घेऊन जाणारे आहे, असे सडेतोड मत महाराव यांनी मांडले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

विज्ञान संपले सांगण्यासाठी विज्ञानाचीच मदत
आज देशात सुरू असलेल्या बुवाबाजीवरही त्यांनी जोरदार प्रहार केला. गेल्या काही वर्षात भोंदू बाबा बुवांचे सर्वत्र पेव फुटले आहे. हे सर्व स्वत:ला संत महात्मे समजत असले तरी हे सर्व डुप्लिकेट आहे. बुवाबाजी करणारे जिथे विज्ञान संपते तिथून अध्यात्म सुरू होते, अशी मांडणी करतात. मात्र त्यांना विज्ञान संपते हे सांगण्यासाठीही विज्ञानाचा अविष्कार असलेल्या साउंड सिस्टिमची मदत घेऊन सांगावे लागते. असे घाणाघात त्यांनी बुवाबाजीवर केला.

मोदी सरकारच्या काळात अनेक उद्योगपती सरकारी बँकांचे कर्ज घेऊन पसार झाले. मात्र सोबतच अनेक उद्योगपतींचे कर्ज सरकारने माफ केले. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली. गेल्या 9 वर्षांत ‘मोदी सरकार’ने ‘कॉर्पोरेट्स कंपन्यां’वर 15 ते 20 लाख कोटी रुपये उधळले. शिवाय, सरकारी संपत्ती त्यांना कवडीमोलाने विकली; ती कशासाठी? अशा अनेक गोष्टींतून ‘मोदी सरकार’ची व्यापारी वृत्ती स्पष्ट झालीय. ह्यात ‘हिंदुराष्ट्रवाद’ आणि ‘हिंदुराष्ट्र’ कुठे आहे ? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी याबाबत नागरिकांनी सजक राहण्याचे आवाहन केले.

यासह महाराव यांनी पर्यावरण, हिंदुत्ववाद, विज्ञानवाद, समाजवाद यावर आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश बुटे यांनी केले तर संचालन संजय गोडे यांनी केले. उपस्थितांचे आभार अजय धोबे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने वणीकर उपस्थित होते. आज शनिवारी संध्याकाळी 7 वाजता ‘शाहिराची लोकशाही’ या विषयावर ज्ञानेश महाराव आपले विचार मांडणार आहेत. या व्याख्यानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Comments are closed.