विवेक तोटेवार, वणी: कुणाचं काय होईल? याचा काही भरवसा राहिलाच नाही. कोणत्या गोष्टीपायी जीव गमवावा लागेल हेही सांगता येत नाही. बेदम मारहाणीत एकाला आपला जीव गमवावा लागला. अशीच एक घटना यवतमाळ रोडवरील बाकडे पेट्रोल पम्पाजवळ बुधवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली. मारेगाव तालुक्यातील सिंधी येथील अनिकेत कुमरे याने यवतमाळ मार्गावर एका इसमास (वय अंदाजे 45 ते 50) बेदम मारहाण केली.
त्यावेळी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारहाण झालेल्या इसमाची प्रकृती गंभीर असल्याने आधी वणीहून चंद्रपूर व नंतर नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रेफर केले. मात्र त्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
बुधवारी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास या मारहाणीची माहिती वणी पोलीस स्टेशनला मिळाली. यवतमाळ रोडवरील बाकडे पेट्रोल पम्पाजवळ एक इसम गंभीर जखमी अवस्थेत पडून असल्याचे पोलिसांना कळले. माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळ गाठले.
तिथे त्यांना एक मध्यम वयाचा इसम रक्तबंबाळ अवस्थेत आढळला. त्याच्या तोंडाला व डोक्याला भीषण मार लागलेला होता. त्याचे कपडे बाजूला पडलेले होते. तर अंगावर केवळ अंडरविअर होती. सदर इसम इतका गंभीर जखमी होता की तो बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता.
पोलिसांनी लगेच एक ऑटोरिक्षा बोलावली. जखमीला त्या ऑटोत टाकून वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिथल्या डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून जखमीला चंद्रपूर येथे रेफर केले. जखमीला आधी चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फूटेज चेक केले. तेव्हा संपूर्ण दृष्य स्पष्ट झाले. एक इसम जखमीला बेदम मारहाण करताना पोलिसांना आढळला. मारहाण करणारा सीसीटीव्हीत कैद झाला. पोलिसांनी खबरीद्वारे त्याची माहिती काढली. मारहाण करणा-या इसमाची ओळख पटली. मारहाण करणारा इसम हा अनिकेत दादाराव कुमरे रा. सिंधी ता. मारेगाव येथील रहिवासी असल्याचे पोलिसांना समजले.
पोलिसांनी तातडीने आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 118 (2) नुसार गुन्हा दाखल केला. बेदम मारहाण का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. असे कोणते कारण होते की जखमीला प्रकृती अत्यवस्थ होत पर्यंत मारहाण करण्यात आली. त्याच्या अंगावर केवळ अंडरविअरच का होती.
तसेच सदर इसमाला परिसरातील कुणीच कसे ओळखत नव्हते. तसेच ती व्यक्ती त्या ठिकाणी भल्या सकाळी कशासाठी गेली होती. असे अनेक प्रश्न मारहाणीमुळे उपस्थित झाले होते. आता तर त्या इसमाचा मृत्यूच झाला. आता त्या जखमीचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाला एक वेगळेच वळण आले आहे.
आरोपीवर कलम 118 (2),109 अन्वये गुन्हे दाखल झालेत. सदर इसमाची ओळख अजून पटली नाही. तरी सदर इसमास कोणी ओळखत असतील तर पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर (मोबा. क्र. 87 88 57 78 40) व तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी रायबोले (मोबा. क्र. 87 66 083 544) वर संपर्क करावा असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
Comments are closed.