अखेर… जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ‘त्या’ संचालकांचे संचालकपद रद्द

वणी बहुगुणी डेस्क : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाटण शाखेतून संकल्प मुदत ठेव योजनेच्या बनावट पावत्या तयार केल्या प्रकरणी बँकेचे संचालक राजीव मल्लारेड्डी येल्टीवार यांचे बँक संचालक पद रद्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 78 अ (ब) अन्वये विभागीय सह निबंधक सहकारी संस्था अमरावती यांनी दि. 27 फेब्रुवारी 2023 रोजी संचालक राजीव मल्लारेड्डी येल्टीवार यांना बँकेचे समिती सदस्य पदावरून काढून टाकण्यासंबंधी आदेश जाहीर केले आहे. सहकार विभागाच्या या कारवाई मुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

य.जि.म.स. बँकेचे संचालक तसेच शासकीय कंत्राटदार राजीव येल्टीवार यांनी बँकेचे पाटण शाखेचे व्यवस्थापक यांच्या सोबत संगनमत करुन 18 लाख 10 हजार रुपयांचे बनावट FDR तयार करुन बँकेमध्ये आर्थिक अफरातफर करण्यात सहभागी होणे, तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाची फसवणूक केल्या प्रकरणी पाटण पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात भादंविच्या कलम 420, 467, 468 नुसार गुन्हा दाखल करण्यात आले होते. तसेच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रधान सचिव सहकार विभाग महाराष्ट्र राज्य व सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे लेखी तक्रार करून राजीव येल्टीवार यांचे बँक संचालक पद रद्द करण्याची मागणी केली होती. 

सदर प्रकरणी सहकार विभागाने 18 नोव्हेंबर 2022 रोजी राजीव मल्लारेड्डी येल्टीवार यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. प्राथमिक व वैधानिक चौकशीनंतर राजीव येल्टीवार यांनी बँकेची तसेच बांधकाम विभागाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने सहकार विभागाने बँक संचालक राजीव येल्टीवार यांना बँक संचालक पदावरून अपात्र ठरविले आहे. आता या प्रकरणी राजीव येल्टीवार कोर्टात दाद मागणार की काय ? याकडे लक्ष लागलेले आहे.

Comments are closed.