आजारी पत्नीवर डॉक्टर ऐवजी भोंदू वैद्य, जादूटोण्याचा उपचार

पत्नीचा छळ करणा-या पती, सासू व सास-यांविरोधात गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: एकविसाव्या शतकात असताना देखील लोकांच्या मनातील अंधश्रद्धा काही केल्या दूर झालेली नाही. याच अंधश्रद्धेपायी एक सुखी संसार मोडला. पोटाच्या विकाराने त्रस्त असलेल्या पत्नीवर दवाखान्यात उपचार करण्याऐवजी सासरची मंडळी भोंदू बाबाकडे नेत, होम हवन करत. हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देत. आमच्याविरोधात काही कराल तर जादू करून मारून टाकणार अशी धमकीही ते देत. अखेर या प्रकरणी पती व सासू-सास-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी महिला प्रियंका (बदललेले नाव) ही 25 वर्षांची असून ती मुळची मारेगाव येथील रहिवासी आहे. तिचा 2020 मध्ये गोंदिया जिल्ह्यातील व्यवसायीक व ठेकेदार असलेल्या एका तरुणाशी मारेगाव येथील एका मंगल कार्यालयात रितीरिवाजा प्रमाणे विवाह झाला. सुरुवातीच्या काळात सर्व सुरळीत सुरु होते. मात्र काही दिवसातच प्रियंकाला तिच्या सासरचे मंडळी प्रचंड अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले लक्षात आले. तिला पोटदुखीचा त्रास होता. त्यावर उपचार करण्यासाठी ते तिला भोंदू वैद्याकडे नेत, तिला नेहमी घरात उपाशी डांबून ठेवत. तिला होम हवन करण्यास भाग पाडत.

जानेवारी 2023 मध्ये प्रियंकाच्या पोटात दुखले. तेव्हा तिने तिच्या नव-याला दवाखान्यात नेण्याची विनंती केली. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. अखेर प्रियंकाने खूपदा विनवण्या केल्यावर पतीने तिला गोंदिया येथील एका दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तिची प्रकृती खराब असल्याचे सांगत तिला ऍडमिट करण्याचा सल्ला दिला. मात्र तिच्या पतीने माझ्याकडे पैसे नाही. तुला उपचार करायचा असेल तर तुझ्या वडिलांना बोलव. स्वत:वर स्वत:च्या खर्चानेच उपचार करून घे असे म्हणत त्याने हात वर केले व तो दवाखान्यातून निघून गेला.

दरम्यान प्रियंकाला दवाखान्यातच चक्कर आली. त्यामुळे तिथल्या डॉक्टरांनी तिला आयसीयूमध्ये भरती केले. तिच्या वडिलांना निरोप देण्यात आला. दुस-या दिवशी तिचे नातेवाईक गोंदिया येथील दवाखान्यात पोहोचले. डॉक्टरांनी त्यांना वैद्यकीय समस्या समजावून सांगितली. प्रियंकाच्या पोटाचे ऑपरेशन करण्यात आले. तिच्यावर योग्य तो उपचार सुरु केला गेला. दरम्यानच्या काळात तिचा पती किंवा सासरचे कुणीला तिला पाहण्यासाठी दवाखान्यात आले नाही. दवाखान्यातील उपचारानंतर प्रियंकाच्या पालकांनी तिला मारेगाव येथे घरी आणले.

प्रकृती ठिक झाल्यावर प्रियंकाच्या वडिलांनी तिला नांदवण्यासाठी तिच्या पतीला कॉल केला. मात्र त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. उलट तिला वकिलामार्फत नोटीस पाठवण्यात आली. मात्र मुलासाठी ती पतीसोबत नांदण्यास तयार असल्याने तिने याबाबत यवतमाळ येथील सहाय्य कक्षाकडे धाव घेतली. मात्र त्याच्या सुनावलीला पती हजर रहिला नाही. कॉल केल्यावर तो कॉल उचलत नव्हता. अखेर सहाय्य कक्षाने पती व सासरच्या मंडळींवर कार्यवाहीच्या सूचना दिल्या.

जादूटोणा करून मारुन टाकेल !
बैठक करून समेट करावा या उद्देशाने 2023 च्या सप्टेंबर महिन्यात प्रियंकाचे नातेवाईक प्रियंकाच्या सासरी गेले. तेव्हा सासरच्या मंडळींनी त्यांना घरात घेतले नाही. तुमची मुलगी नेहमी आजारी असते. ती अवदासा आहे. ही अवदासा तुम्ही तुमच्या घरातच ठेवा, असे म्हणत मुलीला घरी घेण्यास नकार दिला. जर 10 लाख रुपये दिले. तरच आम्ही मुलीला नांदवतो अशी अट ठेवली. आमच्या विरोधात काही कराल तर तुमच्यावर जादू करून तुम्हाला मारून टाकेन अशी धमकी देखील दिली. अखेर प्रियंकाचे नातेवाईक मारेगाव येथे घरी परत आले.

कोणताही समेट न झाल्याने प्रियंकाने मारेगाव पोलीस ठाणे गाठले. पती, सासू व सासरे यांच्याविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या तिघांविरोधातही हुंडाबंदी कायद्याच्या कलम 3, बीएनएसच्या कलम 85 व 3 (5) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे. प्रियंकाच्या पतीने गोंदिया कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.