चुनखडी उत्खणनाविरोधात गावकरी आक्रमक, आज जनसुनावणी

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील काही गावातील जमिनीचे उत्खणन करून त्यातून चुनखडी बाहेर काढून ती मुकुटबन येथील कंपनीला देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र यामुळे तालुक्यातील मोठया प्रमाणावर शेती उजाड होणार व उत्खणनामुळे होणा-या प्रदूषणामुळे पिकांवरही परिणाम होण्याची भीती शेतक-यांमध्ये व्यक्त होत आहे. याविरोधात वेगाव, डोंगरगाव, दहेगाव परिसरातील शेतकरी एकवटले आहेत. अखेर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज सोमवारी दि. 17 जुलैला स. 11 वाजता डोंगरगाव (वेगाव) ता. मारेगाव येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. या जनसुनावणीला मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

वणी तालुक्यातील मुकुटबन येथे आरसीसीपीएल (एमपी बिर्ला) ही सिमेंट कंपनी आहे. या कंपनीला चुनखडीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. त्यासाठी मारेगाव तालुक्यातील वेगाव, डोंगरगाव, दहेगाव परिसरात खोदकाम करून येथील चुनखडी ही मुकुटबन येथील प्रकल्पाला पुरवायचे ठरले आहे. त्यासाठी डोंगरगाव, दहेगाव, वेगाव परिसरातील 252.36 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. यात 10 किमी परिघ क्षेत्रातील एकूण 55 गावे, 88031 कुटुंबे आणि 364306 एवढी लोकसंख्या बाधित होणार आहे. या खणन पट्ट्यातून दररोज 3 हजार टन चुणखडीची वाहतूक करण्यात येणार आहे.

या प्रकल्पामुळे मारेगाव तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात प्रदूषणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. डोंगरगाव, दहेगाव तसेच वेगाव परिसरातील जमिनी ह्या उजाड होणार असून याचा परिणाम पिंकावर होणार असल्याची भीती शेतक-यांमध्ये आहे. चुनखडीच्या उत्खणनामुळे परिसरामध्ये ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, रसायनाच्या अतिवापराने जल प्रदूषण मोठया प्रमाणावर होणार आहे.

पाण्याची समस्याही वाढण्याची शक्यता
उत्खणनामुळे धूळ मोठया प्रमाणावर उडणार असून त्याचा परिणाम पिकांवर तसेच सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होईल. तसेच प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार होण्याचाही धोका आहे. खोल उत्खणन होणार असल्याने पाण्याची पातळी सुद्धा खाली जाणार आहे. त्यामुळे सध्यापरिस्थितीत असणाऱ्या विहिरी आणि बोअर यांचे पाणी आटणार असल्याची भीती सुद्धा व्यक्त केल्या जात आहे. खदानीमध्ये होणाऱ्या स्फ़ोटकांनी जमीन हादरणार असून घराला तसेच गोठे आणि इतर बांधकामाला तडे जाणार आहे.

या प्रकल्पाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणावर विरोध केलेला आहे. शेतीच जर हातची निघून गेली तर आपले कसे होणार असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. या जनसुनावणीला परिसरातील नागरिक व शेतक-यांनी उपस्थित राहून विरोध करावा असे आवाहन संयोजक अशोक गौरकार, अफजल खलील, दिलीप कोर्पेनवार, पोलीस पाटील पंढरी येटी, तुळशीराम जिवतोडे, राजूभाऊ किंगरे, महादेव चवले, शंकर गोवारकर, मार्गदर्शक वासुदेव विधाते आणि परिसरातील शेतकऱ्यांनी केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.