डोर्ली मर्डर मिस्ट्री- जीव घ्यायचा होता बैलाचा, पण खून केला माणसाचा

दुसऱ्याच्या भांडणात नाहक गेला विलासचा जीव, आणखी तीन आरोपीना अटक

भास्कर राऊत, मारेगाव : दोघांचे वैर होते. त्या वैरातून एकाने दुसऱ्याचे आर्थिक नुकसान करण्याचा प्लान केला. त्यासाठी शेतात बांधलेल्या बैलाला विषारी इन्जेक्शन देऊन मारण्याचा कट रचण्यात आला. मित्रांसह मारेगाव येथील एका बियरबारमध्ये दारु पीत असताना हा प्लान तयार करण्यात आला. ते दारूच्या नशेत तिथे गेलेही. मात्र त्याच वेळी शेतात जागलीसाठी गेलेल्या विलासच्या ही बाब लक्षात आली. बिंग फुटल्याने त्यांनी विलासचा गळा आवळून खून केला. काहीही भांडण नसताना केवळ मुक्या जनावरांचा जीव घ्यायला गेलेले नराधम कुणाच्या अध्ये मध्ये नसणाऱ्या एका माणसाचा जीव घेऊन परत आले. मात्र पोलिसांच्या तत्परतेने डोर्ली येथील ब्लाइंड मर्डर मिस्ट्रीचा सहा दिवसात उलगडा झाला.

सविस्तर घटनाक्रम असा की, रातजागलीसाठी गेलेल्या डोर्ली येथील शेतकरी विलास गौरकार यांचे 8 मे रोजी शेतातच संशयास्पदरित्या मृतदेह आढळला. विलासच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क सुरू असताना पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवीत संशयित म्हणून डोर्ली येथीलच विशाल झाडे याला ताब्यात घेतले होते. तीन दिवसांच्या पोलीस कोठडी दरम्यान विशाल झाडे याने कोणतीही कबुली दिली नव्हती. शेवटी पोलिसांनी विशालचे मोबाईल कॉल सिडीआर काढले. कॉल डिटेलवरून मारेगाव पोलिसांनी रविवारी पहाटे
अजित गैबीदास फुलझेले (39), प्रशांत भोजराज काटकर (34) आणि रुपेश शंकरराव नैताम (29) तिघेही रा. नवरगाव यांना अटक केली

मृतक विलास गौरकर यांचा भाऊ सतीश गौरकर व आरोपी अजित फुलझेले यांचे जुने वैर होते. त्यामधूनच सतीश गौरकर याचे बैल आणि इतर जनावरे विषारी इंजेक्शन देऊन मारायचा प्लान अजितने आखला. या प्लानला मूर्तरूप एका बारमध्ये देण्यात आले. मृतक विलासच्या घरी लग्न असल्याने शेतामध्ये कोणी जागलीसाठी जाणार नसल्याची खात्री अजितला होती. योजनेनुसार 7 मे रोजी सायंकाळी अजित, प्रशांत व रुपेश सतीश गौरकरच्या शेतामध्ये जनावरांच्या गोठ्यात शिरले. परंतु बाजूच्या शेतामध्ये सतीशचा भाऊ विलास गौरकर जागलीसाठी असल्याची चौघाना कल्पना नव्हती.

भावाच्या शेताकडे मानवी हालचाली दिसल्याने विलास तिथे गेला व टॉर्चचा प्रकाश टाकला असता नवरगाव येथील तिघे त्याला दिसले. मृतक विलास त्या तिघांना ओळखत होता. त्यामुळे बिंग फुटल्याच्या भीतीने तिघांनी दुपट्याने विलासचा गळा आवळून खून केला. ही घटना रात्री 9 च्या दरम्यान घडली. घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांनी विशाल झाडे याला संशयित म्हणून अटक केली होती. आज रविवारी पहाटे उर्वरित तीन मारेकऱ्यांना मारेगाव पोलिसांनी अटक केली. तिघांना वणी न्यायालयात हजर करून 4 दिवसाची पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार, सहा. पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी. आर. सावंत, जमादार आनंद अलचेवार, नितीन खांदवे, रजनीकांत पाटील, विवेक राठोड, अफजल खान पठाण, अजय वाभीटकर घटनेचा पुढील तपास करीत आहे. मारेगाव पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments are closed.