पती इंजिनियर, पत्नी पीएचडी; तरीही हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

इतर लोकांच्या नजरेत कशाला येते? कपड्यावरूनही त्रास

बहुगुणी डेस्क, वणी : हुंड्यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात पती, सासू आणि नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेला ₹5 लाख हुंडा आणण्यासाठी मारहाण, शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

तक्रारीनुसार माहिरा (नाव बदललेले वय 27) या वणी येथील रहिवासी असून त्या पीएचडीचे शिक्षण घेत आहेत. सहा महिन्याआधी त्यांचा विवाह वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील एका मुलासोबत मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे झाला होता. मुलगा हा इंजिनियर असून तो बंगलोर येथे एका खासगी कंपनीत काम करतो. लग्नाच्या वेळी मुलीकडून ₹1.50 लाख रोख व इतर साहित्य देण्यात आले होते.

लग्नानंतर सासरी गेल्यानंतर ती एकत्र कुटुंबात राहत होती. मात्र सासरचे मंडळी तिला घराबाहेर निघू देत नव्हते. इतर धर्मांच्या लोकांना दिसू नको तसेच कपडे घालण्यावरून सतत टोकत राहायचे. यावरून पती, सासू आणि नणंद यांनी माहिराला सतत त्रास देण्यास सुरुवात केली. “माहेरून ₹5 लाख घेऊन ये” अशी मागणी करत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात येत होता. तसेच पतीकडून मारहाण केली जात होती.

दरम्यान, गर्भवती असताना घरातील पायऱ्यांवरून पडल्याने तिचा गर्भपात झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतरही छळ सुरूच राहिल्याने विवाहितेने आपल्या वडिलांना माहिती दिली. दोन महिन्याआधी तिच्या वडिलांनी सासरी जाऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी “₹5 लाख आणा, अन्यथा मुलीला जीवाने मारून टाकू,” अशी धमकी दिली. हुंड्याबाबत सकारात्मक भूमिका न घेतल्याने सासरच्यांनी माहिराला घराबाहेर काढले. त्यामुळे माहिराच्या वडिलांनी तिला माहेरी वणीला आणते तेव्हापासून ती वणीतच आहे. 

या प्रकरणी माहिराने वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पती, सासू आणि नणंदेविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 85 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस शिपाई विशाल राठोड करीत आहेत.

पती इंजिनियर तर पत्नी पीएचडी मात्र हुंड्यासाठी विवाहितेला त्रास
Birthday

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.