मूळव्याध म्हणजे काय? मुळव्याध कसा बरा होतो… वाचा सर्जन डॉ. आशुतोष जाधव यांचा ब्लॉक

बहुगुणी डेस्क, वणी: आज पासून आपण वणी बहुगुणी या पोर्टलवर आरोग्य विषयक ब्लॉग सुरू करीत आहोत. यात वणीतील सर्जन डॉ. आशुतोष दत्तात्रय जाधव (MBBS, MS) हे विविध रोग, आजार आणि त्यावरचे उपाय यावर मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या पहिल्या भागात ते मुळव्याध हा आजार आणि त्यावरचे उपचार याबाबत संपूर्ण माहिती देणार आहेत.

मूळव्याध… अवघड जागेवरचं दुखणं… ना सांगताही येत नाही आणि सहनही करता येत नाही… हा आजार अतिशय त्रासदायक असल्याने शत्रूलाही हा आजार होऊ नये असं म्हटलं जातं. विशेष म्हणजे हा आजार मोठ्या प्रमाणात भारतीयांमध्ये आढळून येतो. भारतातील एकूण लोकांपैकी 50 टक्के लोकांना त्यांच्या आयुष्यात कधीनाकधी मुळव्याधाचा त्रास होतो. यातील 5 टक्के लोकांना तर याचा कायमस्वरुपी त्रास राहातो. पुरुषांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक असले तरी महिलांमध्येही थोड्या प्रमाणात हा आजार आढळून येतो. विशेषता गर्भवती अवस्थेत महिलांना हा आजार होऊ शकतो. मुळव्याधाने त्रस्त झाल्याने याचा परिणाम खाण्यापिण्यावर होतो. त्यामुळे थकवा, अस्वस्थता येते. मुळव्याध झाला तर घरगुती उपचार विचारणे, वैद्य किंवा डॉक्टरांचा पत्ता काढणे सुरू होते. काही लोक तर भोंदू उपचार करण्याच्या मागे लागून दुखणे आणखी वाढवतात. मुळव्याध जर प्राथमिक लक्षणांमध्ये असेल किंवा त्याची तीव्रता कमी असेल तर घरगुती उपचार, योग्य आहार, व्यायाम किंवा काही पथ्यानेच रुग्णांना आराम मिळू शकतो. मात्र त्याची तीव्रता अधिक असेल आणि अशा वेळी योग्य उपचार मिळाला नाही, किंवा चुकीचा उपचार सुरू असला तर ते धोकादायक स्टेज पर्यंत जाऊ शकते. त्यामुळेच आज आपण या आजाराबाबत अधिक माहिती घेऊ.

मुळव्याध म्हणजे काय? आणि त्याचे लक्षणं
मुळव्याध ज्याला पाईल्स, बवासीर या नावाने देखील ओळखले जाते. वैद्यकीय भाषेत त्याला Hemorrhoids म्हटले जाते. शौचाच्या ठिकाणी खाज येणे, शौचातून रक्तस्राव होणे, शौचानंतर गुदद्वारातून चिकट स्राव जाणं, गुदद्वाराला सूज येणं, वेदना होणे, पोट साफ न होणे, बद्धकोष्ठता, कोंब येणे इत्यादी मुळव्याधाचे लक्षणं आहेत. दीर्घकाळ मूळव्याध असेल तर दररोज शौचाला, खुर्चीत बसण्याला देखील त्रास होतो. मुळव्याधाचे दोन प्रकार आहेत. एक अंतर्गत मुळव्याध तर दुसरा बाह्य मुळव्याध. अंतर्गत मुळव्याधामध्ये गुदद्वाराजवळ थोड्या वेदना होतात. मात्र या वेदना कमी असल्या तरी या प्रकारच्या मुळव्याधामध्ये शौचाच्या वेळी रक्तस्राव अधिक होतो. तर बाह्य मुळव्याधात वेदना व रक्तस्राव अत्यल्प होतो. पण गुदद्वाराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाज असते.

मुळव्याधाच्या चार स्टेज
मुळव्याधीच्या चार स्टेज (टप्पे) आहेत. या स्टेजनुसार रुग्णांवर उपचार केला जातो. पहिल्या अवस्थेत गुदद्वाराच्या ठिकाणी वेदना होते व खाज सुटते. प्राथमिक अवस्थेतला हा मुळव्याध हा मुळव्याध घरगुती उपचार व पथ्य पाळल्याने बरा होऊ शकतो. दुस-या अवस्थेत वेदना, खाज, याशिवाय रक्तस्राव वाढतो. शिवाय बद्धकोष्ठता होणे, पोट साफ न होणे, गुदद्वाराच्या ठिकाणी कोंब असल्याचे जाणवणे. या लक्षणांसह शौचाच्या वेळी कोंब बाहेर येते मात्र शौचानंतर कोम्ब आपोआप आत जाते. या अवस्थेत औषधोपचार व काही पथ्यपालन करावे लागते.

त्रासदायक आणि धोकादायक तिसरी व चौथी स्टेज
तिसरी व चौथी स्टेज ही अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या स्टेजमध्ये केवळ औषधोपचार व पथ्यपालन कामी येत नाही. त्यासाठी वेगळे उपचार करावे लागतात. तिस-या स्टेजमध्ये पहिल्या दोन स्टेजमधले सर्व लक्षणं वाढलेले असतात. सोबतच तिस-या अवस्थेत शौचाच्या वेळी बाहेर आलेले कोम्ब हे आपोआप आत जात नाही. त्यामुळे कोम्ब बोटाने आत ढकलून टाकावे लागते. तर चौथी स्टेज ही अत्यंत धोकादायक स्टेज आहे. या स्टेजमध्ये कोम्ब बोटाने आत टाकूनही आत जात नाही. ते गुदद्वाराच्या बाहेरच राहते. त्यामुळे तिस-या व चौथ्या स्टेजसाठी ऑपरेशन हा एकमेव उपाय आहे. या स्टेजसाठी जर कुणी औषधोपचार सुचवत असेल तर ती केवळ रुग्णाची फसवणूक असते.

मुळव्याध का होतो?
हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. परंतु 20 ते 50 या वयोगटातील लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. तर बद्धकोष्ठाचा त्रास असणा-या साठी नंतरच्या व्यक्तीला हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. गर्भवती महिलांनाही हा आजार होऊ शकतो. बदलता आहार आणि आपली बदललेली जीवनशैली ही मुळव्याधाची मुख्य कारणं मानली जातात. याशिवाय बद्धकोष्ठता असल्यास शौचविधीच्या वेळेस जोर करणे, कुंथण्यामुळे मुळव्याध होऊ शकते. आहारात तंतुमय पदार्थांची (फायबर्स) कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण(गुणाने) पदार्थ खाणे, वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे, फास्ट फूड, अतितिखट सेवन, अती मांसाहार, सतत बैठे काम, अनियमित दिनचर्या, रक्तदोष, वेळेत शौचास न जाणे, अति जागरण, व्यायामाचा अभाव, व्यायाम करताना अतिशय जड वजन उचलणे, मधुमेह, वृद्धत्वामुळे पचनाची क्रिया मंदावणे तर महिलांमध्ये गर्भारपण इत्यादी मुळव्याधाची कारणं मानली जातात. शौचाच्या वेळी गुदद्वारावर जोर द्यावा लागतो. त्यामुळे वाहिन्यांवर वाजवी पेक्षा अधिक ताण येतो त्यामुळे मुळव्याध होतो.

मुळव्याधावर उपचार….
आरोग्यदायी जीवनशैली व चांगला आहार हाच मुळव्याधावर सर्वोत्तम उपाय आहे. मूळव्याध सुरुवातीच्या टप्प्यात असतानाच घरगुती उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणे, फळे, हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, सुकामेवा, दही, ताक याचा वापर करणे, नाश्ता व जेवण वेळच्यावेळी घेणे याशिवाय अतिरिक्त मांसाहार व अतितिखट टाळणे इत्यादी पथ्य पाळून बरा होऊ शकतो. पश्चिमी पद्धतीच्या कमोडचा वापर करून छोट्या स्टुल किंवा पाटासारख्या थोडे उंच ठिकाणी पाय ठेवून शौच केल्यास रेक्टमची स्थिती बदलते आणि विष्ठा सहज निघते. शिवाय बैठकीची आंघोळ हा देखील एक उपाय आहे. त्यामुळे मुळव्याध वाढत नाही. जर मुळव्याध दुस-या टप्प्यात असेल तर काही औषधोपचार घेऊन (यात काही मलम आणि आणि औषधींचा समावेश असतो.) तसेच आहार-जीवनशैलीत बदल करुन उपचार करता येतात. मात्र तिस-या व चौथ्या स्टेजमध्ये ऑपरेशन हा एकमेव उपाय उरतो. अनेकदा तिस-या स्टेजमधील रुग्ण घरगुती उपाय, पथ्य पाळून मुळव्याध बरा करण्याचा प्रयत्न करतो. परिणामी तो वाढत जाऊन चौथ्या स्टेजवर पोहोचतो. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

किती प्रकारचे ऑपरेशन असतात?
इतर कोणत्याही उपचारांनी फरक पडत नसेल किंवा रुग्णाचा आजार हा इतर उपचारांसाठी योग्य नसेल तर डॉक्टर रुग्णाला मूळव्याधाच्या शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात. तीव्र व पुनरावर्ती मुळव्याधासाठी शस्त्रक्रिया हाच सर्वांत प्रभावी उपाय आहे. पारंपरिक आणि चीर रहित अशा दोन प्रकारच्या मूळव्याधाच्या शस्त्रक्रिया आहेत. दोन्ही शस्त्रक्रियेमध्ये कोम्ब काढले जाते. पारंपरिक शस्त्रक्रियेत चिरा मारून कोम्ब काढले जाते. तर चीर रहित शस्त्रक्रिया हा अत्याधुनिक उपचार आहे. यात कोणताही चीरा न मारता लेजर पद्धतीने कोम्ब काढले जाते. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण त्याच दिवशी घरी जाऊ शकतो आणि अंदाजे 7-10 दिवसांत आपले दिनक्रम परत सुरू करू शकतो.

अधिक माहितीसाठी किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी संपर्क –
पत्ता: जाधव सर्जिकल क्लिनिक, नांदेपेरा रोड, वणी
पूर्व नोंदणी साठी संपर्क: 9511860868, 9730106428
किंवा: समर्थ मेडिकल, नांदेपेरा रोड, वणी येथे संपर्क साधावा. 

सर्जन डॉ. आशुतोष दत्तात्रय जाधव (MBBS, MS) हे मुळचे वणीतील ढुमे नगर येथील रहिवाशी असून त्यांनी शालेय शिक्षण वणीतच पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी GMC नागपूर येथून आपले MBBS व MS चे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना दिल्लीतील सुप्रसिद्ध FMAS (FELLOWSHIP IN Minimal Access Surgery) ही फेलोशिप मिळाली आहे. शिवाय त्यांना Coloproctology या विषयातील ISCP International Society of Coloproctology द्वारा फेलोशिप मिळालेली आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.