उद्या हजारो कार्यकर्त्यांसह डॉ. महेंद्र लोढा यांचा काँग्रेस प्रवेश

वामनराव कासावार यांच्या वाढदिवसनिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यात पक्षप्रवेश... निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश आणि वामनराव कासावार यांचा मास्टरस्ट्रोक

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांचा वणी विधानसभा क्षेत्रातील हजारो कार्यकर्ते व राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांसह सोमवारी काँग्रेस प्रवेश होणार आहे. वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वामनराव कासावार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी वणीतील वसंत जिनिंगच्या लॉनमध्ये अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच सोहळ्यात डॉ. महेंद्र लोढा हे काँग्रेस प्रवेश करणार आहे. मारेगाव आणि झरी नगरपंचायतीमध्ये वामनराव कासावार यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसला मिळालेले चमकदार यश व त्यातच वणीच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील एका पक्षाचे सर्व बडे पदाधिकारी व नेते काँग्रेस प्रवेश करीत असल्याने हा कासावार यांचा एक राजकीय मास्टरस्ट्रोक मानला आहे.

पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात राज्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत, खार जमिनी विकास व भूकंप पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच यावेळी मारेगाव व झरीजामणी नगरपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सरचिटणीस पदावर असताना डॉ. महेंद्र लोढा यांनी वणी विधानसभा क्षेत्रामध्ये पक्षाला नवसंजीवनी दिली. वणी, मारेगाव व झरीजामणी तालुक्यात गावोगावी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शाखा उघडून कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार केली. मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून अपेक्षेप्रमाणे सहकार्य मिळाले नाही. तेव्हापासून डॉ. लोढांसह राकाँपचे इतर नेते पक्षांतरच्या वाटेवर होते.

सद्यस्थितीत राज्यात आणि देशात मतदारांचा कल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे वाढत आहे. त्यामुळे खासदार बाळू धानोरकर आणि माजी आमदार वामनराव कासावार यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून डॉ. महेंद्र लोढा व त्यांचे सहकारी नेते व कार्यकर्त्यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचा हात धरण्याचा निर्णय घेतला.

डॉ. लोढांची मदत, वामनरावांचा मास्टरस्ट्रोक
नुकत्याच झालेल्या मारेगाव व झरी येथील नगरपंचायतीमध्ये काँग्रेसने घवघवीत यश मिळवले. वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनात या निवडणुका झाल्यात. या निवडणुकीत झरी नगरपंचायतीचा प्रभार डॉ. लोढा यांना दिला होता. तसेच मारेगाव येथेही डॉ. लोढा यांनी उमेदवारांच्या प्रचारासाठी परिश्रम घेतले. राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेसमध्ये गेल्याने त्याचा फायदा काँग्रेसला झाल्याचे दिसून आले आहे. आगामी वणी नगरपालिका व जिल्हा परिषदेचे निवडणुकीतही हा प्रभाव दिसून येणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वामनराव कासावार यांचा हा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे.

अभिष्टचिंतन सोहळा व पक्षप्रवेश कार्यक्रमात सत्कारमूर्ति माजी आमदार वामनराव कासावार, मंत्री नितिन राऊत, विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धांनोरकरसह माजी मंत्री माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, आमदार वजाहत मिर्झा, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे व इतर अनेक मान्यवर उपस्थिती राहणार आहे.

Comments are closed.