क्रांतिसूर्य,ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विश्वव्यापकच होते- डॉ. राजपूत

जैताई मंदिर सभागृहातील भारतमाता पूजनात झाले सुश्राव्य व्याख्यान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे क्रांतिसूर्य आणि ज्ञानसूर्य होते. त्यांचं कार्य हे केवळ भारतापुरतंच मर्यादित नाही. तर त्यांचे कार्य आणि विचार हे सार्वकालिक आणि वैश्विक आहेत. त्यांचे सर्वसमावेश कार्य इतके मोठे आहे की, ते खऱ्या अर्थाने विश्वरत्न आहेत. त्यांनी प्रकांड ज्ञान संपादन केले. त्या बळावर व बाबासाहेबांनी प्रचंड मोठी क्रांती केली.

त्यांना दलितांचे कैवारी म्हटले जाते. पण त्यांच्या कृतीतून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दलितांसोबत इतर समाजातील गोरगरीब पुरुष व महिलांचा जास्त विचार करून काम केले आहे. त्यामुळे ते सर्वसामान्यांचे कैवारी होते असे प्रतिपादन येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. डॉ. करमसिंग राजपूत यांनी केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

संस्कार भारती, जैताई मंदिर आणि सागर झेप बहुउद्देशीय संस्था, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतमाता पूजन झाले. या उत्सवात युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर जैताई मंदिरात आयोजित व्याख्यानात डॉ. राजपूत बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैताई मंदिराचे अध्यक्ष माधवराव सरपटवार हे होते. अतिथी म्हणून संस्कार भारतीच्या संध्या अवताडे या उपस्थित होत्या.

विषय अधिक स्पष्ट करताना डॉ. राजपूत म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांनी देशाची घटना तयार केली. अनुसूचित जातींच्या कलमांआधी इतर मागासवर्गीय समाजांसाठीच्या कलमांचा अंतर्भाव केला. सरकारमध्ये मिळालेल्या अधिकारांचा उपयोग करून शेतकरी, नोकरदार, महिला, कामगार यांच्यासाठी भविष्याचा विचार करून निर्णय घेतले. त्यांना आवश्यक कायदे केलेत. हिंदू कोड बिल व ओबीसी आयोगासाठी तत्कालीन सरकारने केलेल्या चालढकलीच्या विरोधात मंत्रिमंडळाचा राजीनामा देणारे बाबासाहेब हे दूरदृष्टीचे युगपुरुषच होते.

या प्रसंगी आयोजक संस्थेकडून ‘भावी पिढीचे भविष्य’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत
प्रथम क्रमांक तेजस्विनी गव्हाणे, द्वितीय कांचन गुरनुले, तृतीय तर्फीया अन्सार शेख व चतुर्थ क्रमांक झिनथ अन्सार शेख ह्यांनी मिळविला. त्यांच्यासह इतर 6 स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आलीत. यातील पहिल्या दोन क्रमांकाच्या स्पर्धकांना पुन्हा या मंचावरून भाषण देण्याची संधी देण्यात आली .

अध्यक्षीय भाषण करताना माधव सरपटवार यांनी युगपुरुष डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची महती विषद केली. कार्यक्रमाचा आरंभ सुप्रिया केदार यांनी सादर केलेल्या खरा तो एकची धर्म या साने गुरुजींच्या गीताने झाला. प्रास्ताविक प्रवीण सातपुते यांनी केले. संचालन सुप्रिया केदार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व आभार सागर मुने यांनी मानले.

कार्यक्रमाची सांगता विजय गंधेवार प्रस्तुत महाराष्ट्रगीताने झाली. राजू खुसपुरे, उमाकांत म्हसे, पंढरीनाथ सोनटक्के, अर्पित मोहुर्ले, संस्कार भारती समितीच्या अध्यक्ष रजनी पोयाम, राजू तुराणकर, मनोज उरकुडे, बाळू हेडाऊ, प्रज्वल ठेंगणे, उमेश पोद्दार, शेखर वांढरे, घनश्याम आवारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments are closed.