बहुगुणी डेस्क, वणी: वरातीमुळे कार पुढे काढताना झालेल्या वादात एकाने कार चालकाला जबर मारहाण करीत कारची काच फोडली. या घटनेत कार चालक जखमी झालेत. तसेच त्यांच्या कारचे मोठे नुकसान झालेत. मुकुटबन रोडवरील विनायक मंगल कार्यालयाजवळ सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार काढताना दुचाकीचालक व कार चालकामध्ये वाहनाचा धक्का लागल्यातून सदर वाद झाल्याची माहिती आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी सुरेश भुवाजी आसुटकर (57) हे नांदेपेरा रोडवरील विनायक नगर वणी येथील रहिवासी आहे. त्यांचे वेल्डिंगचे दुकान आहे. सोमवारी दिनांक 5 मे रोजी दु. 12.30 वाजताच्या सुमारास ते कुटुंबासह त्यांच्या कारने विनायक मंगल कार्यालयात जात होते. दरम्यान विनायक मंगल कार्यालयाजवळ एक वरात बँडबाजासह जात होती. वरातीमुळे रस्ता ब्लॉक झाला होता. त्यांची कार समोर जात नसल्याने त्यांनी पत्नीला खाली उतरवले व ते वरात जाण्याची वाट पाहत होते.
दरम्यान आरोपी शंकर श्रावण थेरे (36) रा. छोरिया टाऊनशिप, गणेशपूर हे पत्नीसह दुचाकीने जात होते. दरम्यान विनायक मंगल कार्यालयाजवळ सुरेश यांनी शंकरला बाजूला होण्याची विनंती केली. मात्र त्यावर शंकर चिडला व त्याने सुरेश यांना शिविगाळ करीत बाजूला असलेला दगड उचलला. त्याने ड्रायव्हर साईडच्या विंडोची दगडाने काच फोडली. यात सुरेश यांच्या डोक्याला जखम झाली. तसेच शंकरने सुरेश यांना गाडीबाहेर खेचून लाथाबुक्यांनी मारहाण केली. या मारहाणीत सुरेश हे जखमी झाले. तसेच त्यांच्या कारचे सुमारे 30 हजारांचे नुकसान झाले.
तर कार काढताना सुरेश यांच्या कारची शंकर यांच्या दुचाकीला धडक बसली. यात त्यांच्या पत्नी दुचाकीवरून खाली पडल्या. यातून शंकर व सुरेश यांच्यात सदर वाद झाल्याची माहिती आहे. सुरेश यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी शंकर विरोधात बीएनएसच्या कलम 125 (a), 324(4), 352,351 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.


Comments are closed.