जवळपास 2,500 वर्षांपूर्वी होतं ‘हे’ साम्राज्य, किल्ला आणि परकोटसुद्धा

वणीजवळ सापडल्यात 'ह्या' कधीच न पाहिलेल्या गूढ वस्तू

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: वणी आणि परिसराला प्रचंड मोठा इतिहास आहे. अगदी डायनासोरपासून तर मध्ययुगातील काही समृद्ध राजवटींपर्यंत इथं बरंच काही आढळत आहे. नजिकच्या कायर येथे 2,500 वर्षादरम्यानच्या प्राचीन आणि समृध्द राजवटीचे पुरावे मिळालेत. त्यात सातवाहन ते वाकाटक काळातील किला-पराकोट मिळाल्याचीही माहिती आहे. कायर ही अतिशय प्राचीन काळापासून मानवी वस्ती राहिली. येथे इतिहासपूर्व पाषाणयुगीन काळापासून ते सातवाहन आणि वाकाटक काळापर्यंतचा इतिहास पहायला मिळतो. प्रा सुरेश चोपणे गेल्या काही वर्षांपासून या परिसरात सर्वेक्षण आणि संशोधन करीत आहेत. त्यांच्या अभ्यासानुसार तिथे 2,500 वर्षापूर्वींच्या काळातील पुरावे तसेच सातवाहन, क्षत्रप आणि वाकाटक काळात माती, दगड,आणि विटाचा ४००० फुट लांबीचा घेरा असलेला मोठा किल्ला बांधण्यात आला होता. येथील लोक विटा, मातीची घरे बनवीत होते. ते शेती आणि पशुपालन करत. त्यांच्याकडे सोने, चांदी, तांब्यांची आभूषणे होती.अशी माहिती पुरातत्व संशोधक प्रा सुरेश चोपणे ह्यांनी दिली.

मुबलक पाण्याचा परिसर म्हणून नाव पडलं ‘कायर’

कायर हे यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी तालुक्यातील एक मध्यम लहान गाव. ते वणीपासून 20 किमीवर दक्षिणेला आहे. पूर्वीचे प्राचीन कयार गाव आजच्या कायरपेक्षा मोठे होते हे विशेष. पूर्वी कायरला कयार म्हणजे मुबलक पाण्याचा प्रदेश असे म्हटलं जात होते. आज अपभ्रंश होऊन ते कायर झालं. येथे पाषाणयुगीन काळात मानववस्ती होती. रामायण-महाभारत काळापासून मानव ह्या भागात राहत असल्याचं सांगतात. लागूनच असलेल्या भूडकेश्वर येथे गरम पाण्याचे झरे आहेत. त्यामुळे भौगोलिक आणि धार्मिकदृष्ट्या हा भाग खूप महत्वाचा ठरतो. यवतमाळ जिल्ह्यातील ही सर्वात प्राचीन मानवी वस्ती असण्याची शक्यता प्रा चोपणे ह्यांनी वर्तविली आहे.

इथं इसवीसन पूर्व २-३ ऱ्या शतकापासून पासून मानव वस्ती होती. त्याचे अनेक पुरावेदेखील इथं सापडलेत. पुढं क्षत्रप राज्यांशी युद्धात सातवाहनांचा पराभव झाला असावा. ३ ऱ्या ते ६ व्या शतकापर्यंत वाकाटक राज्यांची सत्ता होती. इथं सापडलेल्या शिलालेखात ‘महासेनापती’ असं लिहिलेलं आढळलं. चालुक्य, यादव आणि बाहमनी राजांचंसुद्धा इथं राज्य होतं. इथं बांधलेला माती आणि दगडांचा किल्ला हा सातवाहन – क्षत्रप काळात बांधला गेला. महाराष्ट्रातील प्राचीन सर्वांत मोठा किल्ला, तटबंदी असावी. सर्व राजांनी त्याचा वापर केला. मध्ययुगात मुस्लिमांचं इथं प्राबल्य नव्हतं. मात्र शिरपूरच्या गोंड राज्यांची सत्ता अनेक शतके होती. १७-१९ व्या शतकापर्यंत इथं मराठा राज्यांची सत्ता होती. तर १९ व्या शतकात ब्रिटीशांनी कायरला खूप महत्व दिलं.

इथं सापडला राजाचा दरबार आणि सैनिकांची वस्ती

एक हेमाडपंथी मंदिर असून तिथे पूर्वी गरम पाण्याचे झरे होते. प्राचिन काळापासून हे धार्मिक आणि पवित्र असं केंद्र होते. ह्याच नदीच्या लागून पूर्वेला किला बांधला. विदर्भ नदीच्या पूर्वेला लागुनच ७४३५१ स्के.मीटर जागेवर प्रत्येकी १००० – १००० फूट चौकोनी मातीचा किल्ला बांधला होता. किल्ल्याचा परकोट नैसर्गिक टेकडीवर बांधण्यात आला. खाली मातीचा आणि वरती ५ फूट रुंदीचा दगड आणि विटांचा आढळतो. किल्ल्याच्या आतील भागात मातीची आणि काही चिऱ्यांची घरे आढळतात. इथं ८-८ आकाराच्या विटा, ८-१० आकाराच्या लहान मोठ्या विटा, भाजलेल्या मातीची मडके, रांजण, गळ्यांतील मणी, पडलेली मातीची घरे, चार कोपऱ्यांवर चार बुरुज आणि पश्चिम-उत्तर बुरुजावर परकोटावर काळ्या दगडावर कोरलेली शिवलिंग आणि पादुका आढळल्यात.

विशेष म्हणजे किल्याच्या आंत तुरळक अश्मुयुगीन अवजारे आढळलीत. प्राण्यांची हाडे आणि दातसुद्धा आढळले आहेत. किल्ला आणि परकोटाच्या उत्तर-दक्षिण आणि पूर्वेला एक वर्ग किमी एवढी वस्ती होती. परकोटात राजा, त्यांचा दरबार आणि प्रमुख सैनिक राहत असावेत. किल्याच्या बाहेर नागरिक आणि सैनिक राहत असावेत. कदाचित ही सातवाहनांची राजधानी असावी.

ब्राह्मी लिपीतील २ शिलालेख मिळाले

या परिसरात २०१२-१३ मध्ये नागपूर विद्यापिठाच्या इतिहास विभागाने सर्वेक्षण केले होते. परंतु त्यांचा रिपोर्ट अजूनही प्रकाशित झाला नाही. पुढं २०१५ मध्ये शासनाच्या पुरातत्व विभागाला ३००० वर्षांदरम्यानचे ऐतिहासिक पुरावे मिळालेत. मणी, सील, लज्जागौरी मूर्ती, मातीची मडकी, टेराकोटा रिंग, स्त्रियांचे अलंकार, हाडांची अवजारे, लोखंडाची अवजारे, सोन्याच्या बांगड्या, मानव आणि प्राण्यांच्या प्रतिमा, मणी, धान्य साठवण्याची भांडी, विहीर आणि इतर पुरावे मिळाले होते. २०२० मध्ये इथे ब्राह्मी लिपीतील २ शिलालेख मिळाले होते.

इथं २०१५ साली झालेल्या संशोधनात किती खजिना सापडला किंवा काय काय पुरावे आढळले? त्याची काहीही माहिती प्रकाशित केली नाही. त्यामुळे तेथे आढळलेले सोने, चांदी, नाणी आणि मौल्यवान पुरावे कुठे गेलेत? असा संशय कायरचे सरपंच नागेश धनकसार ह्यांनी व्यक्त केला आहे. तशी तोंडी तक्रार त्यांनी प्रा. चोपणे ह्यांच्याकडे केली. ह्याची सखोल चौकशी व्हावी आणि कायरच्या इतिहासाला उजाळा द्यावा, अशी विनंती त्यांनी प्रा. सुरेश चोपणे ह्यांच्याकडे केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.