पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी शहराची लोकसंख्या आता लाखाच्या घरात पोहोचली असली तरी महिलांसाठी सार्वजनिक प्रसाधनगृहांची सुविधा अद्याप उपलब्ध नाही. दररोज हजारो महिला शाळा, महाविद्यालये, बँका, शासकीय कार्यालये तसेच खरेदीसाठी शहरात ये-जा करतात. शहराला महिला नगराध्यक्ष मिळाल्या असून नगरपरिषदेत सोळा महिला नगरसेविका आहेत. तरीही एवढ्या मोठ्या शहरात महिलांसाठी एकही सुसज्ज प्रसाधनगृह नसणे ही खेदजनक व शरमेची बाब ठरते. शहरातील महात्मा गांधी चौक हा सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. येथे कपडे, धान्य, सराफा, पादत्राणे, स्टेशनरी, सौंदर्यप्रसाधने, भाजीपाला यांसह दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंपासून मंगल प्रसंगासाठी लागणारे साहित्य सहज उपलब्ध होते. दिवसभर महिलांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, मात्र प्रसाधनगृहाच्या अभावामुळे त्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो.
एक आत तर दुसरी बाहेर
बसस्थानकापासून दीपक चौपाटीपर्यंतच्या मुख्य परिसरात महिलांसाठी प्रसाधनगृह नाही. गांधी चौकात पुरुषांसाठी प्रसाधनगृह असले तरी महिलांसाठी सुविधा नाही. काही वर्षांआधी गांधी चौकाजवळच एका संस्थेच्या वतीने महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र काही महिन्यांतच त्याची देखभाल थांबली आणि वास्तू शोभेपुरती उरली. परिणामी महिलांना नाईलाजाने पुरुषांचे प्रसाधनगृह वापरावे लागते. अशावेळी एक महिला आत जाते तर दुसरी बाहेर थांबते, असे लाजीरवाणे प्रकार रोज घडतात. इतकेच नव्हे तर चौकातील मोकळ्या जागेतही महिलांना उघड्यावर प्रसाधन करावे लागते.
प्रसाधनगृहातील प्रमुख समस्या
शहरातील बहुतेक सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्ये स्वच्छतेचा अभाव आहे. पाणी नसणे, दुर्गंधी पसरलेली असणे आणि साफसफाई न होणे ही सामान्य बाब झाली आहे. सुरक्षेचाही प्रश्न गंभीर असून अनेक शौचालयांना दरवाजे, कड्या किंवा पुरेसा प्रकाश नसतो. अशा असुरक्षित वातावरणामुळे महिलांना त्रास सहन करावा लागतो. अस्वच्छ प्रसाधनगृहांचा वापर केल्याने आरोग्याचे धोके वाढतात, विशेषतः मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI) आणि इतर आजारांचा धोका अधिक तीव्र होतो. मुख्य बाजारपेठा, बसस्थानके आणि हायवे परिसरात महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे नसल्याने समस्या अधिक गंभीर बनली आहे.
प्रशासकीय दुर्लक्ष
नुकत्याच झालेल्या वणी नगरपरिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक महिला नगरसेविका निवडून आल्या असून नगराध्यक्षही महिला आहेत. गांधी चौक प्रभागाचे नगरसेवक आरोग्य सभापती असून, याच प्रभागातील महिला नगरसेविका दुसऱ्यांदा नगरपरिषदेत पोहोचल्या आहेत. आपल्या मतदारसंघाच्या खासदार देखील महिला आहे. तरीही महिलांच्या मूलभूत प्रश्नांकडेच दुर्लक्ष होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसते. एकीकडे महिलांना लाडक्या बहिणी म्हणून संबोधायचे मात्र दुसरीकडे त्यांनाच गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर प्रसाधनगृहांची व्यवस्था असली तरी त्यांची रचना महिलांसाठी सोयीची नाही. काही ठिकाणी प्रसाधनगृह मागच्या बाजूस तर काही ठिकाणी समोर असल्याने महिलांना तिथे जाणे टाळावे लागते. याशिवाय बाजारपेठेतील कुठल्याच दुकानात ग्राहकांसाठी प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध नाही. स्वच्छता, सुरक्षा आणि आरोग्याच्या प्रश्नांनी महिलांचे हाल होत असताना प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. अन्यथा, वणी शहराच्या विकासाच्या दाव्यांवर ही गंभीर कमतरता कायम काळी छाया टाकत राहील.


Comments are closed.