मोठ्या भावाची लहान भावाला चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी

जितेंद्र कोठारी, वणी: दुकानाच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाला चाकू दाखवून धमकावले व जीवे मारण्याची धमकी दिली. मंगळवारी संध्याकाळी वरोरा रोड येथे ही घटना घडली. या प्रकरणी आईने मोठ्या मुलाविरोधात वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विजय वामनराव मत्ते याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी शिलादेवी वामनराव मत्ते (72) या वरोरा रोड वणी येथील रहिवासी आहेत. त्यांना विजय वामनराव मत्ते व पंकज वामनराव मत्ते अशी दोन मुले आहेत. शिलादेवी या त्यांचा लहान मुलगा पंकज व त्यांच्या कुटुंबासह राहतात. पंकज हा फर्निचरचे दुकान चालवून उदरनिर्वाह करतो. तर मोठा मुलगा विजय हा गेल्या काही वर्षांपासून नागपूर येथे राहतो. या दोन भावांमध्ये दुकानावरून वाद सुरू आहे.

मंगळवारी दिनांक 20 जून रोजी संध्याकाळी पंकज हा दुकान बंद करीत होता. त्याच वेळी त्याचा मोठा भाऊ विजय हा दुकानात आला. त्याने दुकानाचा ताबा मिळवण्यासाठी त्याला कुलूप लावण्यास मज्जाव केला व चाकू काढून पंकजला धमकावले. तसेच शिविगाळ कळत त्याने दुकानाला त्याने आणलेले कुलूप लावले.

सदर दुकान हे फिर्यादी शिलादेवी यांच्या पतीच्या नावे आहे. पतीच्या मृत्यूनंतर त्याचा ताबा हा शिलादेवी यांच्याकडे आला आहे. शिलादेवी या लहान मुलासोबत राहत असल्याने तोच हे दुकान सांभाळतो. याच दुकानाच्या द्वारे त्यांचा उदरनिर्वाह होतो. मात्र त्यांचा मोठा मुलगा विजय या दुकानावर ताबा सांगत आहे. त्यामुळे या दोघांमध्ये दुकानावरून वाद सुरू आहे. याआधीही यावरून वाद झाला असून याबाबत फिर्यादीने आधी देखील याबाबत तक्रार नोंदवली आहे.

दुकानाला मोठ्या मुलाने कुलूप लावल्याने व चाकू दाखवून लहान मुलाला धमकी दिल्याने शिलादेवी यांनी बुधवारी दिनांक 21 जून रोजी वणी पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विजय वामनराव मत्ते याच्या विरोधात भादंविच्या कलम 341, 359, 504 व 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.