पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे डॉ. महेंद्र लोढा यांना उमेदवारी ?

महाविकास आघाडीतर्फे डॉ महेंद्र लोढा यांचे नाव चर्चेत... रंगणार एक डॉक्टर विरुद्ध दुसरे डॉक्टर सामना ?

निकेश जिलठे, वणी: सध्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहू लागेल आहेत. भाजप व काँग्रेसमध्ये ही लढत होणार आहे. या जागेसाठी भाजपचे विद्यमान आमदार डॉ. रणजीत पाटील यांनी तिसऱ्यांदा तयारी सुरु केली आहे. तर ही जागा काँग्रेसकडे असल्याने महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसला ही जागा मिळणार आहे. काँग्रेसचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नसला तरी काँग्रेसतर्फे वणीचे काँग्रेसचे नेते डॉ. महेंद्र लोढा यांचे नाव चर्चेत येत आहे. यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीची शनिवारी यवतमाळ येथे बैठक झाली. या बैठकीत डॉ. महेंद्र लोढा यांना उमेदवारी देण्याबाबत ठराव झाला असून त्यांच्या नावाचा प्रदेश कार्यकारिणीकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे डॉ. लोढा यांनीही मोर्चेबांधणीवर जोर दिल्याने एक डॉक्टर विरुद्ध दुसरे डॉक्टर असा सामना तर रंगणार नाही? अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघाची काँग्रेसची उमेदवारी ही दरवेळी पश्चिम विदर्भाकडे जाते. त्यातच अनेक वर्ष ही जागा अकोला व अमरावतीकडे राहिली आहे. गेल्या दोन खेपेत काँग्रेसला ही जिंकता आलेली नाही. त्यामुळे यावेळी ही जागा यवतमाळ जिल्ह्याला सोडावी, अशी मागणी जोर धरत आहे. यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आहे. तसेच मतदारसंख्या देखील यवतमाळ जिल्ह्यात मोठी आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याला तिकीट मिळाल्यास ही जागा जिंकता येऊ शकते असा विश्वास जिल्ह्यातील नेत्यांना आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याला ही जागा द्यावी यासाठी जिह्यातील दिग्गज नेते आग्रही आहे. त्यासाठी त्यांनी वणीचे डॉ. महेंद्र लोढा यांचे नाव पुढे केले असून याबाबत प्रदेश कार्यकारिणाला प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे. 

2023 मध्ये अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. ही जागा काँग्रेसच्या खात्यातील आहे. यावेळी ही जागा महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढली जाणार आहे. विद्यमान आमदार व गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांना भाजपने आधीच तिकीट जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांचा सामना डॉ. पाटील यांच्याशी होणार आहे. डॉ. पाटील हे फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओखळले जातात. त्यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे काही नावे चर्चेत आहे. मात्र या जागेसाठी यवतमाळ जिल्ह्यातून डॉ. महेंद्र लोढा यांच्या
उमेदवारीसाठी सर्वच दिग्गज नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे यावेळी जिल्ह्यातील उमेदवाराला ही जागा मिळण्याची शक्यता वाढली आहे. 

गेल्या निवडणुकीत 1.5 लाख मतदार होते. दरवेळी मतदारसंख्या वाढत असल्याने या निवडणुकीत सुमारे 2.5 लाख मतदार राहू शकतात असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस असलेले डॉ. महेंद्र लोढा यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. तीन वर्षांआधी अनेक गावात रस्ते, पाणी, लायब्रेरी इत्यादी सामाजिक उपक्रम राबवून ते चांगलेच चर्चेत आले होते. आता खुद्द जिल्ह्यातील माणिकराव ठाकरेसह अनेक दिग्गज नेते त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहे. माजी आमदार वामनराव कासावार हे देखील त्यांच्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. त्यामुळे हा सामना एक डॉक्टर विरुद्ध दुसरे डॉक्टर होणार का? अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Comments are closed.