वणी आगारात कर्तव्यावर असलेल्या कर्मचा-याला बसची धडक

जितेंद्र कोठारी, वणी: रिपेअर झालेल्या बसची ट्रायल घेत असताना एका कर्मचा-याला बसची जबर धडक बसली. यात कर्मचा-याचा मृत्यू झाला. रविवारी रात्री 8.30 वाजताच्या दरम्यान एसटी डेपोच्या आवारात ही घटना घडली. कमलेश सेनापती धोपटे (41) असे मृत कर्मचा-याचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे की कमलेश धोपटे हे जैन ले आऊट येथील रहिवासी होते. ते एसटी डेपो मध्ये सहायक मेकॅनिक पदावर कार्यरत होते. रविवारी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी त्यांची सं. 5 ते रा. 2 अशी शिफ्ट होती. नेहमी प्रमाणे ते कामासाठी डेपोमध्ये होते. रात्री 8.30 वाजताच्या सुमारास वर्कशॉप मध्ये काम करणारे हेड मेकॅनिक हे बिघाड झालेल्या एका बसची (MH40N 8641) फ्लोअरवर ट्रायल घेत होते. त्याच वेळी फ्लोअरच्या शेवटी कमलेश हे एका दुस-या गाडीच्या टायरचे काम करीत होते.

हेड मेकॅनिक बस रिव्हर्स घेत असताना गाडीचा ब्रेक न लागल्याने गाडीची कामात मग्न असलेल्या कमलेश यांना धडक बसली. या अपघातात कमलेश यांच्या डोक्याला भीषण मार लागला. घटनास्थळावरील कर्मचा-यांनी त्यांना तातडीने आधी नजीकच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांना ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयात कमलेश यांचे परिचितांनी गर्दी केली होती. 

कमलेश हे मनमिळावू स्वभावाचे होते. सामाजिक कार्यातही ते कायम अग्रेसर राहायचे. त्यांच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे आगारातील कर्मचारीवर्गात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहे. कमलेश यांच्या मागे आई-वडील, भाऊ, बहिण असा आप्तपरिवार आहे.  

Comments are closed.