मारेगाव तालुक्यात आणखी एक शेतकरी आत्महत्या

रामेश्वर येथील शेतक-याने कीटकनाशक प्राशन करून संपवले जीवन

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील रामेश्वर येथील एका शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 7 ते 8 च्या दरम्यान उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव प्रमोद व्यंकटेश एकरे असून वय अंदाजे 41 असे आहे. कर्जबाजारी झाल्याने प्रमोद यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.

प्रमोद एकरे हे रामेश्वर येथील रहिवासी होते. त्यांच्याकडे दोन एकर शेती होती. तसेच ते काही शेती ठेक्याने करून आपली उपजीविका करीत होते. प्रमोद सकाळी शेतामध्ये गेले होते. सायंकाळ झाली तरी ते घरी परत न आल्याने त्याचा सर्वत्र शोध घेण्यास परिचितांनी सुरुवात केली. अखेर शेतातील कुंपणाजवळ प्रमोद पडलेल्या अवस्थेत आढळला. तसेच त्यांनी कीटकनाशक प्राशन केल्याचेही आढळून आले. त्यांच्या कुटुंबीयांना प्रमोद यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. प्रमोदच्या पश्चात आईवडील, पत्नी आणि दोन मुले आहे.

आर्थिक अडचण, कर्जबाजारीतून आत्महत्या?
सततची नापिकी आणि त्यात यावर्षी पडलेला दुष्काळ त्यामुळे प्रमोद कर्जात बुडाले असल्याची महिती आहे. अशातच मागील वर्षी त्यांचा मुलगा आजारी होता. त्यालाही उपचारासाठी मोठया प्रमाणात खर्च झालेला होता. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त त्यामुळे नैराश्यात असलेल्या प्रमोदने कीटकनाशक घेऊन आपले जीवन संपविल्याचे बोलले जात आहे.

तालुक्यात एक दिवस आड आत्महत्येच्या घटना उघडकीस येत आहे. त्यात अधिकाधिक आत्महत्या या कर्जबाजारी, नापिकी यातून झाल्याचे समोर येत आहे. हे सत्र गेल्या दोन वर्षांपासून सुरू असूनही या बाबत ना लोकप्रतिनिधी गंभीर आहे ना प्रशासन. रोज तालुक्यातील आत्महत्यांचा आकडा वाढत आहे.

Comments are closed.