वनोजादेवी येथे कीटकनाशक पिऊन शेतक-याची आत्महत्या

या कारणामुळे उचलले आत्महत्येचे पाऊल...

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील वनोजादेवी येथील शेतकरी अधिकराव कृष्णाजी घोरुडे (60) यांनी रविवार दि. 18 डिसेंबरला कीटकनाशक प्राशन करून आपले जीवन संपवले. शेतात समाधानकारक परिस्थिती नसल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम झाला. कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेतून हा प्रकार घडला. असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.

अधिकराव कृष्णाजी घोरुडे (60) हे वनोजादेवी येथे राहायचे. त्यांची गावालगतच 8 एकर शेती आहे. त्यांनी शेतीसाठी एका बँकेचे व इतर ठिकाणाहूनही कर्ज घेतले होते. यावर्षी पावसाने त्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे आता त्या कर्जाची परतफेड कशी करायची, याबाबत ते चिंतेत होते. या विवंचनेत असलेल्या अधिकराव यांनी दि. 18 डिसेंबर रोज रविवारला सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान शेतात जाऊन कीटकनाशक प्राशन केले.

शेतात असलेल्या काहींना ही घटना माहिती झाली. त्यामुळे आजुबाजुच्या शेतकऱ्यांनी तसेच घरच्यांनी घटनास्थळी धाव घेत अधिकराव यांना पहिले वणी येथील शासकीय रुग्णालय येथे दाखल केले. परंतु प्रकृती खालावत गेल्याने त्यांना तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यानच रात्री 11 वाजताच्या नंतर त्यांचा मृत्यू झाला.

अधिकराव यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुले, एक मुलगी, नातवंड आणि आप्त परिवार आहे. त्यांनी उचललेल्या या पावलामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मारेगाव तालुक्यात सातत्याने आत्महत्या होत आहे. मात्र यावर अद्यापही ना लोकप्रतिनिधी किंवा ना शासनातर्फे याकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

Comments are closed.