विवेक तोटेवार, वणी: शास्त्रीनगर येथून बेपत्ता झालेल्या 3 अल्पवयीन मुली प्रकरणी वणी पोलिसांनी एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. एका मुलीच्या पालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी शास्त्रीनगर येथील एका आरोपी विरोधात फूस लावून पळवून नेल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपी एहतेशामवर गुन्हा दाखल झाला असला तरी पंचशील नगर येथील पीडित तरुणींना अद्याप न्याय मिळाला नसल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अनिल तेलंग यांनी दिली आहे.
मुलीच्या पालकाच्या तक्रारीनुसार, दिनांक 11 जुलै रोजी पीडित अल्पवयीन मुलगी ही संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास शेजारी घरकामाला जाते सांगून घरून निघून गेली होती. मात्र बराच वेळ होऊनही ती परत आली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी ती ज्या घरी गेली त्या घरी चौकशी केली असता त्या घरी ती घरी कामाला आलीच नसल्याचे कळले. त्यानुसार त्यांनी वार्डात शोध घेतला असता आणखी दोन मुली गायब असल्याचे त्यांना कळले. त्यावरून या तिन्ही मुलीच्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठले.
दरम्यान त्यांना त्या मुली पंचशील नगर येथील एका घरी असल्याचे कळले. तिथे जाऊन पोलिसांनी त्या मुलींना पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी या बेपत्ता झालेल्या मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. दिनांक 27 जुलै रोजी सकाळी त्यातील तक्रारकर्त्यांच्या मुलीने तिच्या पालकांना एहतेशाम कबिर रज्जाक (28) रा. शास्त्रीनगर वणी हा तरुण त्यांना फूस लावून वाईट उद्देशाने पुण्याला घेऊन जाणार असल्याचे सांगितले.
मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी एहतेशाम कबिर रज्जाक विरोधात भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
शास्त्रीनगर प्रकरणी गुन्हा दाखल, पंचशील नगर येथील पीडितांना न्याय कधी?
आरोपी एहतेशामने या तीन अल्पवयीन मुलींना पुण्याला नोकरीला लावून देतो असे सांगून पुण्याला घेऊन जाणार होता. मात्र मुलींना फूस लावून पळवल्यानंतर त्याने लॉकडाऊनचे कारण सांगून त्या तीन मुलींना पंचशील नगर येथील रहिवाशी असलेल्या 2 तरुणीच्या घरी खोटे बोलून ठेवले होते. तिथे पोलिसांनी पंचशील नगरच्या तरुणींना सेक्स रॅकेट चालवण्याचा आरोप करत अपमानास्पद वागणूक देत रात्री 9 वाजताच्या दरम्यान पोलीस ठाण्यात नेले. तिथे त्यांना शिविगाळ करून मारहाण केली. तसेच रात्री 12.30 वाजताच्या दरम्यान सोडून न देता घरी पाठवले असा आरोप पंचशील नगर येथील दोन पीडित बहिणींनी केली होता.
या प्रकऱणी पंचशील नगर येथील पीडित बहिणींनी उपविभागीय पोलीस अधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले होते. सोमवारी या प्रकरणी त्या बहिणींनी यवतमाळ येथे जाऊन पोलीस अधिक्षक यांची भेट घेतली होती. या प्रकरणी पंचशील नगर येथील पीडित तरुणींनाही न्याय द्या अशी मागणी करत बेपत्ता मुलीच्या प्रकरणी आरोपीवर बाल संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा का दाखल केला नाही? असाही सवाल सामाजिक कार्यकर्ते अनिल तेलंग यांनी उपस्थित केला आहे. पंचशील नगर प्रकरणी एसपींना दिलेल्या निवेदनावर अऩिल तेलंग, कृपाशिल तेलंग, गौरव जवादे, ऍड रुपेश ठाकरे, संदीप गोहोकर, दिलीप भोयर, प्रलय तेलतुंबडे यांच्यासह पीडित तरुणींच्या सही आहेत.