बहुगुणी डेस्क, वणी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या परसोडा येथील एका 21 वर्षीय गर्भवती विवाहितेने सोमवारी दिनांक 30 सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात पती, सासू, सासरा व नणंद यांचा समावेश आहे. याबाबत मृत पायल गौरव उरकुडे यांच्या आईने तक्रार केली. या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
नवरगाव ता. वणी येथील रहिवासी असलेल्या पायल चारलीकर यांचा परसोडा येथील गौरव उरकुडे याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. काही दिवसांनंतर या दोघांच्या संसारवेलीवर एक फुल देखील उमलणार होते. ती सात महिन्यांची गरोदर होती. घरी बाळाचे आगमन होणार म्हणून त्यांनी नवीन घराचे बांधकाम सुरु केले. त्यामुळे ते भाड्याच्या घरात राहत होते. 30 सप्टेंबर रोज सकाळी 11 वाजताच्या दरम्यान घरी कोणी नसताना पायलने ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
पैशासाठी पायलचा छळ
नवीन घराचे बांधकाम सुरु असल्याने पायलला तिच्या सासरचे मंडळी 1 लाख रुपये घरून आणण्यासाठी तगादा लावत होते. त्यामुळे तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. यासह तिचा नवरा हा तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. जर घरून पैसे आणले नाही तर दुसरे लग्न करणार, अशी धमकी देखील तो द्यायचा. अखेर हा शारीरिक व मानसिक छळ सहन न झाल्याने पायलने आत्महत्या केली, असा आरोप पायलच्या आईने केला.
मुलीची आई संगिता चारलीकर यांनी मुकुटबन पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. त्यावरून बुधवारी दिनांक 2 ऑक्टोबर रोजी पती गौरव मारुती उरकुडे (24), सासरे मारुती उरकुडे (50) सासू मालू मारोती उरकुडे (45) नणंद निकिता मारुती उरकुडे (20) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.
Comments are closed.