बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील घोन्सा नजिकच्या झमकोला जवळचं दरारा हे छोटंसं गाव. सोमवारची दुपारची वेळ होती. त्या घरी विनोद मारुती कुडमेथे, त्याची पत्नी आणि मुलगा राहत होते. सकाळची काम उरकून नवरा-बायको कामाला घराबाहेर पडलेत. लहान मुलगा आपल्या दोस्तांसोबत खेळायला बाहेर गेला. अचानक कुणाच्या ध्यानीमनी नसताना फ्रिजचा मोठा स्फोट झाला. एवढा मोठा आवाज ऐकल्यावर परिसरातले सगळेच अवाक झालेत. पाहतो तर काय, क्षणात संपूर्ण घराने पेट घेतला.
धान्य, कपडा-लत्ता, शाळेचं दप्तर, अत्यावश्यक साहित्य असं सगळं काही जळून राख झालं. हाती काहीच शिल्लक राहिलं नाही. घराचंही प्रचंड नुकसान झालं. भिंतींना तडे गेलेत. खूप मोठी पडझड झाली. छताच्या टिनाही उखडल्यात. विनोदचा मोठा भाऊ, त्याची पत्नी आणि लेकरू, त्यांची आई आणि विनोदचा त्रिकोणी परिवार सलग राहतो.
सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही. यात अंदाजे दीड ते दोन लाख रूपयांचे नुकसान झाले. विनोदच सगळं होतं नव्हतं संपलं. त्याचा संसार उघड्यावर आला. त्याला शासनाकडून मदत मिळावी अशी अपेक्षा त्यासह अन्यही करीत आहेत. तहसील प्रशासनाने घटनेचा पंचनामा केला. या धक्क्यातून विनोदसह संपूर्ण गाव अजूनही सावरलं नाही.
Comments are closed.