जितेंद्र कोठारी, वणी: आज दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास शहरातील आबड भवन येथील फर्निचर दुकानाला भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण फर्निचर दुकान जळून खाक झाले असून या आगीत दुकान मालकाचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ही आग इतकी भीषण होती की चंद्रपूर जिल्ह्यातूनही अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्यासाठी बोलवण्यात आल्या. शहरातील गेल्या कित्येक वर्षातील ही सर्वात भीषण आग असल्याचे बोलले जात आहे. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग विझवण्यात आल्याची माहिती आहे.
शहरातील टागोर चौक परिसरात अनेक वर्षांपासून आबड भवन ही इमारत आहे. या इमारतीचा समोरील भागात कमर्शिअल वापरासाठी गाळे आहेत. इथेच शहरातील रहिवाशी असलेले धवल विजयचंद कटारिया यांचे रत्नम फर्निचर्स नावाचे दुकान आहे. आबड भवनच्या हॉलच्या भागात या दुकानाचे शोरूम तर मागच्या बाजूस गोदावून बनवण्यात आले आहे. आज दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास रत्नम फर्निचर्स या दुकानाच्या मागच्या बाजूस असलेल्या भागाने अचानक पेट घेतला.
रत्नम फर्निचर्स या दुकानात लाकडी दिवाण, सोफासेट, पलंग, आलमारी, टीव्ही, फ्रिज इत्यादी वस्तूंची विक्री होते. 3.30 वाजताच्या सुमारास रत्नम शोरूम येथे (आबड भवनच्या हॉलमध्ये) टिनाच्या शेडजवळ आग लागली. फर्निचरचे दुकान असल्याने आगीने काही क्षणातच संपूर्ण शोरूम आपल्या कवेत घेतले. ही बाब लक्षात येताच तातडीने अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाचे 2 वाहने व 1 पाणी टँकर द्वारा आग विजविण्याचे प्रयत्न सुरू झाले.
मात्र आग आटोक्यात येत नसलल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, माजरी, वरोरा येथून आणखी अग्निशामक वाहन बोलाविण्यात आले. ही आग इतकी भीषण आहे की वृत्त लिहेपर्यंतही (दु. 5 वा.) आग विझवण्यात यश आले नाही. आगीची माहिती मिळताच शहरवासीयांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. गर्दीमुळे व वाहतुकीमुळे आग विझवण्यात अडचण येत असल्याने काही काळ टिळक चौक ते टागोर चौक हा रस्ता बंद करण्यात आला होता.
या आगीत दुकानाच्या शोरूम व गोडावूनमधला संपूर्ण माल जळून खाक झाला आहे. तसेच शोरूमचे टिनाचे शेड, भिंत गॅलरी देखील आगीच्या भक्षस्थानी आली. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून अद्याप आगीत किती नुकसान झाले हे कळू शकले नाही. मात्र सुमारे 1 ते 1.5 कोटींचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागिय अधिकारी शरद जावळे, तहसीलदार निखिल धुळधर, ठाणेदार रामकृष्ण महल्ले व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. ता.क: दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात यश आले.
Comments are closed.