जैन स्थानक समोरील दुकानाला भीषण आग, दुकान जळून खाक

सुमारे 5 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज 

जब्बार चीनी, वणी: शहरातील जैन स्थानक समोरील एका दुकानाला भीषण आग लागली. सकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. तसेच दुकानात ठेवलेली मोपेड देखील या आगीत जळाली. या दुर्घटनेत 5-10 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडची गाडी पोहोचली. अर्ध्या तासाच्या परिश्रमानंतर आग विझवण्यात यश आले.

वणीतील जैन स्थानक समोर रमेश ट्रेडर्स नावाने एक किराणा दुकान आहे. यात किराणा, डेअरी प्रॉडक्ट, कोल्ड्रिंक्स इत्यादींची विक्री होते. दुकानासमोर दुकानाचे मालक रमेश पुण्यानी राहतात. सकाळी 6 वाजताच्या सुमारास मॉर्निंग वॉक करणा-या व्यक्तींना दुकानातून धूर येताना दिसला. त्यांनी याची माहिती दुकान मालकाला दिली. 

मालकांनी तातडीने याची माहिती फायर ब्रिगेडला दिली. घटनास्थळी वाहन चालक देविदास जाधव फायरफायटर शाम तांबे व दीपक वाघमारे पोहोचले. दुकानातील किराणा मालाने पेट घेतल्याने आगीने तेव्हा रौद्ग रूप धारण केले होते. फायरब्रिगेडच्या जवानांनी काही वेळातच आग विझवली.

मीटरमधून शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे रौद्र रूप बघता ही आग 5.30 वाजताच्या सुमारास लागल्याचा कयास आहे. आग लागल्याची माहिती मिळताच लोकांनी गर्दी केली होती. आगीत 5 – 10 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

फायर ब्रिगेडकडे एकच चालक
घटनेची माहिती मिळताच पोलीस दल व अ‍ॅम्ब्युलन्स देखील घटनास्थळी दाखल झाली होती. त्यानंतर फायर ब्रिगेड दाखल झाली. सध्या फायर ब्रिगेडकडे एकच चालक आहे व त्याच चालकाकडे फायरब्रिगेडची गाडी, सफाई गाडी, टँकर इत्यादींची जबाबदारी आहे. त्यामुळे इतर कामात चालक असल्यास घटनास्थळी पोहोचण्यास वेळ होतो. गेल्या 5-6 वर्षांपासून चालकाचे पद रिक्त आहे. पालिका प्रशासनाने ही समस्या तातडीने सोडवण्याची गरज आहे.

Comments are closed.