वणी-घुग्गुस मार्ग सुरू, मात्र वणी-वरोरा मार्ग अद्यापही बंदच

सकाळ पर्यंत पूर ओसरण्याची शक्यता, आमदारांनी घेतील पूरग्रस्तांची भेट

जितेंद्र कोठारी, वणी: दोन दिवस पुराने हाहाकार माजवल्यानंतर पुराचे पाणी ओसरायला आता सुरुवात झाली आहे. मात्र पाटळ्याच्या पुलाच्या अद्याप 5 फुटावरून पाणी वाहणे सुरू आहे. त्यामुळे वणी-वरोरा हा मार्ग अद्यापही बंद आहे. तर वणी-घुग्गुस हा मार्ग मंगळवारी दुपार पासून बंद होता, हा मार्ग आता हलक्या वाहनासाठी सुरू करण्यात आला आहे. मात्र अवजड वाहनांसाठी अद्यापही या मार्गावरून वाहतूक बंद आहे. आज मध्यरात्री ते सकाळ पर्यंत पुराचे पाणी ओसरणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आज वणी व मारेगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला.

आज पुरामुळे उकणी येथील 500 नागरिकांना गावातीलच ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये हलवण्यात आले. शिवणी (जहांगिर) गावामध्ये अद्यापही पाणी आहे. पुरामुळे शिवणी व चिंचोली या गावातील काही लोकांना बचाव पथकाने रेस्क्यू केले. सध्या सावर्ला येथील कॉलेजमध्ये झोला आणि कोना येथील सुमारे 1 हजार लोक आहेत. येथे त्यांच्या भोजनाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर पशूधनासाठी चा-याची देखील येथे व्यवस्था करण्यात आली आहे.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा पूरग्रस्त भागांचा दौरा
पुरामुळे सध्या वणी तालुक्यातील 6 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे तर मारेगाव तालुक्यातील 4 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. आज आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी वणी व मारेगाव तालुक्यातील पूरग्रस्त गावांचा दौरा केला. दरम्यान त्यांनी पूरग्रस्तांना एक महिन्याचा मोफर रेशन देण्याची मागणी प्रशासनाकडे केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकसान ग्रस्तांना आर्थिक दिलासा देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली.

सध्या वणी तालुक्यातील शेलु, रांगणा, भुरकी, वडगांव, झोला, कोना, जुनाड, चिंचोली, कवडशी, सावंगी आणि उकणी या गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. तर मारेगाव तालुक्यातील सावंगी-कोसारा, दापोरा,
चिंचमंडळ, केगाव, चनोडा, शिवणी-धोबे, दांडगाव, आपटी आणि गाडेगाव ही गावे पुराने प्रभावित झाली आहेत.

Comments are closed.