विकासकामांच्या श्रेयावरून आजी-माजी आमदार आमने-सामने
आ. संजय देरकर हे फुकटचे श्रेय घेत असल्याचा बोदकुरवार यांचा आरोप
बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणा-या विकासकामांच्या भूमिपूजनावरून आजी-माजी आमदार यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. मारेगाव तालुक्यातील आकापूर येथील सिमेंट रस्त्याच्या कामाचे शुक्रवारी दि. 3 जानेवारीला आ. संजय देरकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी आमदार वामनराव कासावार यांच्यासह मारेगाव तालुक्यातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र त्याला माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आक्षेप घेतला आहे. हे काम त्यांच्या कार्यकाळात मंजूर झाले असून संजय देरकर हे आपल्या कामाचे श्रेय घेत असल्याचा आरोप बोदकुरवार यांनी केला आहे.
काय आहे हे प्रकरण?
दिनांक 3 जानेवारी रोजी मारेगाव तालुक्यातील आकापूर येथे एकनाथ भरणे यांच्या घरापासून ते वरुड लाखापूर रोडपर्यंत सिमेट रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. या विकासकामासाठी विशेष विकासनिधी अंतर्गत 10 लाखांचा निधी प्राप्त झाल्याचा फलकामध्ये उल्लेख आहे. फलकावर वरच्या बाजूने बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा फोटो आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक आ. संजय देरकर तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार यासह अनिल देरकर, अरुणा खंडाळकर, शीतल पोटे, मनिष मस्की, संदीप कारेकार यांची प्रमुख उपस्थिती, असा उल्लेख फलकावर आहे.
काय आहे आक्षेप?
या कामाला माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना आक्षेप घेतला आहे. आमदार असताना त्यांनी विविध विकासकामासाठी 6 कोटींचे काम मंजूर केले होते. यातील एक काम हे आकापूर येथील रस्त्याचे आहे. या कामासाठी खनिज विकास निधीतून 10 लाख रुपये मंजूर करून घेतले. या कामाला प्रशासकीय मंजुरात 16 फेब्रुवारी 24 ला मिळाली. 25 जुलै रोजी या कामासाठी निधी मंजूर झाला. सदर कामासाठी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत प्रत्यक्ष खान बाधित क्षेत्रात भौतिक पायाभूत सुविधा शीर्षकाखाली निधी मंजूर झाला होता. त्यामुळे या भूमीपूजनाच्या बोर्डवर पंतप्रधानांचा फोटो लावणे आवश्यक आहे. मात्र या फलकावर त्यांच्याऐवजी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहे. याला देखील बोदकुरवार यांनी आक्षेप घेत हा प्रकार शासकीय प्रोटोकॉलचा भंग असल्याचा आरोप केला आहे.
आमदारांचा फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न – संजीरेड्डी बोदकुरवार
माझ्या कार्यकाळात विधानसभा क्षेत्राच्या विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्यात आला. यातील अनेक कामांचे भूमिपूजन झाले आहे. मात्र भूमिपूजन झाल्यानंतर आमदार संजय देरकर हे पुन्हा भूमीपूजन करीत आहे. अद्याप राज्यातील आमदारांना कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध झालेला नसताना त्यांनी निधी कुठून आणला कुठून? हा फुकटचे श्रेय घेण्याचा प्रकार आहे. तसेच फलकावर नरेंद्र मोदी यांचा फोटो नसल्याने हा शासकीय प्रोटोकॉलचा देखील भंग आहे.
– संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी आमदार
यावर अद्याप आमदार संजय देरकर यांची प्रतिक्रिया प्राप्त झाली नाही. या संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या आरोपामुळे आजी-माजी आमदार आमने सामने आलेले दिसून येत आहे. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी मंजूर केलेले विकास कामांपैकी अनेक विकास कामांना अद्यापही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे भविष्यात हा वाद आणखीनच वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Comments are closed.