मोबाइल साधा तरीही त्याला ‘कव्हर’, मग डोक्याला ‘हेल्मेट’ का नाही !

जितेंद्र कोठारी, वणी: हेल्मेट न घालणाऱ्यांवर वाहतूक विभाग सातत्याने कारवाई करते. मात्र तरीही हेल्मेट हे दुचाकीस्वारांना ओझ वाटू लागतं. डोक्यावर हेल्मेट नसल्याने अनेकांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. अपघात झाल्यावर याचं महत्त्व दुचाकीस्वारांना कळतं, पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. हेल्मेट न घातल्याने बळी पडलेल्यांची संख्या देशभरात वाढत चालली आहे. हीच बाब लक्षात घेऊन वणी येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ता विजय चोरडिया यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून स्थानिक वाहतूक विभागाच्या सहकार्यातून गरजू दुचाकी चालकांना मोफत हेलमेटचे वितरण केले.

वणी येथील वाहतूक उप शाखा प्रांगणात आयोजित हेलमेट वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार होते. तर वणीचे उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक अजित जाधव, वाहतूक शाखा प्रमुख सपोनि सीता वाघमारे, विजय चोरडिया, विजय पिदूरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यकर्मात बाहेर गाववरून दररोज वणी येथे दूध, फळ, भाजी घेऊन येणारे गरजू दुचाकी चालकांना उत्तम दर्जाचे हेलमेटचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करतांना उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी सांगितले की आपल्याकडे साधा मोबाइल असला तरी आपण त्याची सुरक्षा म्हणून कव्हर लावतो. मग मोबाइल पेक्षा कितीतरी पटीने महत्वाचे असलेले डोक्यावर हेलमेट लावायला हयगय का केली जाते. संपूर्ण जगात दुचाकी हा सर्वात असुरक्षित वाहन असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितले की, वाहतूक नियम मोडल्यास वेगवेगळ्या दंडाची रक्कम आकारली जाते. त्यामुळे दुचाकी चालकांमध्ये कायद्याची धाक उरली नाही. वाहतूक कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दानशूर विजय चोरडिया यांनी सुद्धा यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना नागरिकांना आवाहन केले की, कुणीतरी घरी तुमची वाट पाहत आहे. ती तुमची आई होऊ शकते, पत्नी, बहीण, मुलगी, मुलगा होऊ शकते. त्यामुळे वाहन सावकाश व हेलमेट घालूनच चालवा. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Comments are closed.